‘रत्नागिरी खबरदार’च्या बातमीचा मोठा दणका! नाट्यगृहातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ‘आकृतिबंधा’ची पडताळणी सुरू!

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहाच्या देखभालीवर होणारा भरमसाठ खर्च आता प्रशासनाच्या रडारवर आला आहे. ‘रत्नागिरी खबरदार’ने या उधळपट्टीबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. नाट्यगृहातील १५ कंत्राटी कामगारांचा मक्ता मंजूर ‘आकृतिबंधा’नुसार (Staffing Pattern) आहे की नाही, याची कसून पडताळणी सुरू झाली असून, हा मक्ता रद्द करण्याचा विषय आगामी सर्वसाधारण सभेसमोर येण्याची दाट शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सावरकर नाट्यगृहाच्या देखभालीसाठी नगरपालिका दरमहा सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च करते. वार्षिक हिशोब पाहिल्यास हा खर्च ६१ लाख ३४ हजार १९० रुपयांच्या घरात जातो. मात्र, त्या तुलनेत नाट्यगृहातून नगरपालिकेला वर्षाकाठी केवळ १५ ते २० लाख रुपयांचेच उत्पन्न मिळत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अफाट असल्याने नगरपालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी नगर परिषदेच्या सभागृहात सर्व विभागप्रमुखांची मॅरेथॉन बैठक पार पडली, ज्यामध्ये या खर्चिक मक्त्याचा आढावा घेण्यात आला.

सध्या नाट्यगृहात १५ कंत्राटी कामगार कार्यरत आहेत, ज्यामध्ये १ व्यवस्थापक, ७ वॉचमन, २ इलेक्ट्रिशिअन आणि २ सफाई कामगारांचा समावेश आहे. सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज बिल कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी होत असताना, मनुष्यबळावर होणारा नाहक खर्च कमी करण्यासाठी आता प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.


मक्ता घेणारी संस्था अडचणीत; काटकसरीवर भर

रत्नागिरी नगर परिषद आर्थिक अडचणीत असून, ती अवसायानात निघू नये यासाठी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी ‘काटकसर’ मोहीम हाती घेतली आहे. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी स्वतःच्या मानधनासह इतर शासकीय सुविधा नाकारून आदर्श घालून दिला आहे. यापूर्वी आरोग्य विभागातील ८० पैकी २० कंत्राटी कामगार कमी करण्यात आले आहेत. आता नाट्यगृहाचा मक्ता घेणारी सहकारी संस्थाही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.