अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर अडकली लग्नबंधनात!

मुंबई: आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने आयुष्याच्या एका नव्या आणि सुंदर अध्यायाला सुरुवात केली आहे. १४ फेब्रुवारी म्हणजेच जागतिक प्रेमदिनी अपूर्वा तनुज गोवळकर याच्याशी विवाहबंधनात अडकली असून, सोशल मीडियाद्वारे तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘सौ. अपूर्वा तनुज गोवळकर’

रविवारी सकाळी अपूर्वाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर लग्नसोहळ्याचे काही खास फोटो पोस्ट केले. यावेळी तिने एक भावूक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी आता सौ. अपूर्वा तनुज गोवळकर झाले आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. १४ फेब्रुवारी २०२६ ही तारीख माझ्यासाठी कायमची आठवणीत राहणारी ठरेल,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.


“माझ्या प्रेमाला त्याचं घर सापडलं”

अपूर्वाने आपल्या पोस्टमध्ये भूतकाळातील संघर्षावरही भाष्य केले आहे. ती म्हणाली:

“गेल्या काही काळात आयुष्याने माझी परीक्षा घेतली. मला कधी घडवलं तर कधी खचवलं, तर कधी पुन्हा उभं केलं. अनेक वादळं अनुभवल्यानंतर देवाने मला शांततेची अनुभूती दिली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर त्याने मला साथ दिली आणि व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी माझ्या प्रेमाला त्याचं घर सापडलं.”

अपूर्वा पुढे म्हणाली की, ही तिच्या आयुष्यातील ‘दुसऱ्या डावाची’ सुरुवात आहे. हा प्रवास प्रगल्भता, सामंजस्य आणि एकमेकांबद्दल असलेल्या आदराच्या पायावर उभा असल्याचेही तिने आवर्जून नमूद केले.

जुना प्रवास आणि नवी जिद्द

अपूर्वा नेमळेकरचे पहिले लग्न २०१४ साली रोहन देशपांडे यांच्याशी झाले होते, मात्र काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर बरीच वर्षे अपूर्वा सिंगल होती आणि तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले होते. बिग बॉस मराठी सीझन ४ मध्ये तिने आपल्या आक्रमक आणि स्पष्टवक्त्या खेळीने उपविजेतेपद पटकावले होते.

चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव

अपूर्वाच्या लग्नाचे फोटो समोर येताच तिच्यावर चाहत्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “आज मला पूर्णत्व लाभल्यासारखे वाटत आहे. मी खूप कृतज्ञ आणि आनंदी आहे,” असे म्हणत तिने चाहत्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 16-02-2026