सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण: शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील आकले-तळवडेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पतीसह सासू-सासरे आणि दोन दिरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


नेमकी घटना काय?

चिपळूण तालुक्यातील आकले-तळवडेवाडी येथील जयश्री विजय मोहिते (वय २७) हिचा विवाह ३ जुलै २०१७ रोजी विजय मोहिते याच्याशी झाला होता. लग्नानंतरची सुमारे चार वर्षे त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अपत्य होत नसल्याच्या कारणावरून २०२२ पासून सासरच्या मंडळींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या सततच्या छळाला कंटाळून जयश्रीने २३ डिसेंबर २०२५ रोजी विष प्राशन करून आपले जीवन संपवले.

कोणाकोणावर झाले गुन्हे दाखल?

याप्रकरणी जयश्रीचे वडील नामदेव लक्ष्मण मोहिते (वय ७६, रा. पुणे) यांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

  • विजय भगवान मोहिते (पती)
  • भगवान शिवा मोहिते (सासरे)
  • कुसूम भगवान मोहिते (सासू)
  • राजू भगवान मोहिते (दीर)
  • नेताजी भगवान मोहिते (दीर)

हे सर्व आरोपी आकले-तळवडेवाडी येथील रहिवासी आहेत.

पोलीस तपास सुरू

अपत्य नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अलोरे-शिरगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 16-02-2026