लांजा : कोचरी बौद्धवाडीत अगरबत्ती लावण्यावरून राडा; सख्ख्या चुलत भावासह तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी (लांजा): लांजा तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश राजाराम कांबळे (वय ४४) आणि आरोपी क्र. १ कुंदन अनंत कांबळे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. गेल्या एक वर्षापासून त्यांच्यामध्ये वाडीतील दोन गटांमध्ये वाद सुरू आहेत. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास दिनेश कांबळे हे घराशेजारील बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपी कुंदन कांबळे याने त्यांना “तू कशाला अगरबत्ती लावतोस, इथून निघून जा” असे म्हणून हटकले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर लवकरच शारीरिक हिंसाचारात झाले.

हातातील कड्याने डोळ्यावर वार

राग अनावर झाल्याने कुंदन कांबळे याने फिर्यादींना थापाड्यांनी मारहाण करत ढकलाढकल केली. याच दरम्यान कुंदनचे भाचे निलेश अनिल जाधव (वय २३) आणि अजय अनिल जाधव (वय २८) हे देखील तिथे पोहोचले. त्यांनी दिनेश यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. यावेळी आरोपी निलेश जाधव याने आपल्या हातातील कडा काढून दिनेश यांच्या डोळ्याखाली मारला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.

विशेष म्हणजे, पतीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या दिनेश यांच्या पत्नीलाही आरोपींनी धक्काबुक्की केली. या संपूर्ण घटनेत दिनेश कांबळे हे जखमी झाले आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर दिनेश राजाराम कांबळे यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी १५ फेब्रुवारी रोजी पहाटे २:२२ वाजता आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या कलमान्वये झाली कारवाई: भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम:

  • ११८(१): धोकादायक शस्त्राने दुखापत करणे.
  • ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे.
  • ३५१(२): गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे.
  • ३(५): समान उद्देशाने केलेले कृत्य.

या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत. कौटुंबिक आणि गटबाजीच्या वादातून झालेल्या या घटनेमुळे कोचरी परिसरात खळबळ उडाली आहे.