गुहागर : जिल्हाध्यक्षांचा निरोपानंतर भाजपमधील नाराजांच्या तलवारी म्यान!

◼️ भाजप ताकदीनिशी महायुतीचा प्रचार करणार

गुहागर : मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीने गुहागरात भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते; मात्र दुपारी ११ च्या दरम्यान जिल्हाध्यक्षांचा निरोप आल्याने अर्ज भरणे रद्द झाले. पुढील दोन दिवसात पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक होईल. त्यानंतर गुहागर मतदार संघातील भाजपचे कायकर्ते महायुतीचा प्रचार संपूर्ण ताकदीनिशी करतील, असे गुहागरचे भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी सांगितले.

गुहागरमध्ये आज भाजपच्या तिन्ही तालुकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांची सभा झाली. या सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सुर्वे म्हणाले, गेली दोन-अडीच वर्षे भाजपच्या वरिष्‍ठांच्या सांगण्यावरून आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यात पसरलेल्या गुहागर विधानसभा मतदार संघात ३२२ मतदान केंद्र आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही भाजपचे संघटनात्मक काम उभे केले.

लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वात विधानसभा लढण्यासाठी नियोजन केले होते; मात्र अचानक मंत्री रवींद्र चव्हाण आमच्या सांत्वनासाठी इथे आले. तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती; परंतु सोमवारी रात्रीपर्यंत गुहागरची विधानसभा महायुतीतर्फे कोण लढणार, याची अधिकृत माहिती मिळत नव्हती. त्यामुळेच भाजप म्हणून विधानसभा मतदार संघातून सुर्वेंनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय झाला. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली; मात्र आज सकाळी जिल्हाध्यक्षांकडून महायुतीतर्फे राजेश बेंडल शिवसेनेच्यावतीने उमेदवार असतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे अर्ज भरण्याचा विषय आम्ही रद्द केला.

घटक पक्षांवर आम्ही नाराज नव्हतो
आमची नाराजी व राग आमच्या संघटनेअंतर्गत बाब आहे. महायुतीतील घटक पक्षांवर आम्ही नाराज नव्हतो. आम्हाला तयारी करायला सांगून नंतर अचानक थांबायला सांगितले गेल्याने भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी वरिष्‍ठांवर नाराज आहेत. ही नाराजी आम्ही नेत्यांजवळ बोलूनही दाखवली आहे. आमच्या अंतर्गत बाबींचा कोणताही परिणाम महायुतीच्या प्रचारावर होणार नाही, असेही सुर्वे यांनी सांगितले.

माजी आमदार विनय नातू अनुपस्थित
मंगळवारच्या भाजपच्या पत्रकार परिषदेलाही माजी आमदार व विधानसभा समन्वयक डॉ. विनय नातू अनुपस्थित होते. याचे कारण सांगताना सध्या कौटुंबिक विषयात विनय नातू व्यग्र आहेत. समन्वय समितीच्या बैठकीपासून ते देखील संपूर्ण ताकदीनिशी प्रचारात सहभागी होतील, असे सुर्वे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 30-10-2024