रत्नागिरीत कौटुंबिक वादातून वहिनीला बेदम मारहाण; पळून केलेल्या लग्नाच्या रागातून दिराचे कृत्य

रत्नागिरी: शहरातील धनजीनाका परिसरात एका कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीवर लाकडी लाटण्याने आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादीची बहीण आणि आरोपीचा भाऊ यांनी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकी घटना काय?

फिर्यादी महिला आणि आरोपी अंजार बशीर हकीम (वय ३०, रा. धनजीनाका) हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. फिर्यादीची बहीण आणि आरोपीचा भाऊ आरफात बशीर हकीम यांनी कुटुंबाचा विरोध झुगारून पळून जाऊन विवाह केला होता. या विवाहाला आरोपी अंजारचा पाठिंबा होता, मात्र फिर्यादी महिलेचा कडाडून विरोध होता.

याच कारणावरून गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) दुपारी २:३० च्या सुमारास दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. “तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावली, तशीच माझ्या बहिणीच्या आयुष्याचीही वाट लावायची आहे का?” असा प्रश्न फिर्यादीने विचारताच आरोपीचा राग अनावर झाला.

लाटण्याने हल्ला आणि गंभीर दुखापत

आरोपी अंजारने संतापून किचनमधील लाकडी लाटणे आणले आणि वहिनीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

  • आरोपीने लाटण्याने फिर्यादीच्या उजव्या हातावर आणि डाव्या कानावर प्रहार केले.
  • उजव्या कानावर जोरात फटका मारल्याने फिर्यादीच्या कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला.
  • लाटण्याने मारहाण केल्यानंतर आरोपीने हाताच्या बुक्क्यांनी फिर्यादीच्या पोटातही मारहाण केली.
  • “पुन्हा लग्नाला विरोध केलास, तर ठार मारून टाकीन,” अशी धमकी देत त्याने शिवीगाळ केली.

पोलीस कारवाई

या घटनेनंतर फिर्यादी महिलेने शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी अंजार बशीर हकीम याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 16-02-2026