मंडणगड: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली नळपाणी योजना आणि तीव्र पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या वाल्मिकीनगर ग्रामस्थांनी अखेर प्रशासनाविरुद्ध उपोषणाचे हत्यार उपसले. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी मंडणगड पंचायत समितीच्या आवारात पुकारलेले हे उपोषण प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तीन तासांनी मागे घेण्यात आले.
पाणीटंचाईचा भीषण वास्तव
वाल्मिकीनगर गावास सध्या आठ दिवसांतून केवळ एकदा पाणीपुरवठा होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली नळपाणी योजना गेली तीन वर्षे विविध कारणांनी रखडलेली आहे. ग्रामस्थांना नाईलाजास्तव खासगी टँकरकडून महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ५० हून अधिक महिला आणि पुरुषांनी उपोषणात सहभाग घेतला.
प्रशासनाला धरले धारेवर
सुमारे तीन तास चाललेल्या या उपोषणावेळी गटविकास अधिकारी सुनील खरात आणि पाणी पुरवठा अभियंता सौ. जवादे यांच्याशी ग्रामस्थांची दीर्घ चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी धारेवर धरले.
मिळालेली आश्वासने आणि उपोषण स्थगिती
प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्रात खालील बाबींचे आश्वासन देण्यात आले आहे:
- ८ दिवसात काम सुरू: नळपाणी योजनेचे बंद असलेले काम येत्या ८ दिवसांत सुरू करण्यात येईल.
- दररोज १० हजार लिटर पाणी: जोपर्यंत नळपाणी योजना पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत गावाला दररोज १० हजार लिटर पाणी टँकरने पुरवले जाईल.
या उपोषणात जि. प. सदस्य प्रताप घोसाळकर, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, माजी सभापती आदेश केणे, शहरप्रमुख विनोद जाधव, वेसवी ग्रामपंचायत उपसरपंच आनंद भाटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 17-02-2026














