Gram Panchayat Election 2026: महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाचे बिगुल वाजले आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार आहे.
२० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला सुरुवात
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, प्रभाग रचनेचे काम २० फेब्रुवारी २०२६ पासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे. तहसीलदारांना ‘गुगल अर्थ’च्या मदतीने २० फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर तलाठी आणि ग्रामसेवक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करतील.
हरकती आणि सूचनांसाठी महत्त्वाच्या तारखे (शेड्युल)
ग्रामपंचायत प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपल्या हरकती नोंदवण्यासाठी पुरेशा वेळ देण्यात आला आहे:
- ७ एप्रिल २०२६: ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाईल.
- १३ एप्रिल २०२६: हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत.
- २१ एप्रिल २०२६: प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील.
- २८ एप्रिल २०२६: जिल्हाधिकारी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील.
- ४ मे २०२६: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.
प्रशासनावर मोठी जबाबदारी
प्रभाग रचनेची ही संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रभाग रचनेत पारदर्शकता राहावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (Google Earth) वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे: मुदत संपणाऱ्या आणि नवीन ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम अत्यंत कळीचा ठरणार असून, ४ मे रोजी होणाऱ्या अंतिम प्रसिद्धीनंतर निवडणुकीच्या प्रत्यक्ष तारखांकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 18-02-2026














