चिपळूण (रत्नागिरी): शिवनेरीवरून सुटलेल्या शिवविचारांच्या वाऱ्याने चिपळूण शहर पूर्णपणे शिवमय झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (१९ फेब्रुवारी) चिपळूण नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नगराध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
गुरुवारी सकाळी ठीक पावणेआठ वाजता चिपळूण नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराजांच्या जयघोषाने पालिकेचा परिसर दुमदुमून गेला होता.
यानंतर मार्कंडी येथील शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासही मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह खालील मान्यवर उपस्थित होते:
- प्रशासन: मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे.
- नगरसेवक व पदाधिकारी: आरोग्य सभापती शुभम पिसे, फैसल कासकर, विकी नरळकर, विकी लवेकर, नीलम जाधव, उदय जुवळे, वैशाली कदम, राणी महाडिक, प्रमोद बुरटे, हर्षाली पवार, शहनाज वांगडे, कपिल शिर्के आणि रोहित खाडे. याशिवाय पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
विद्युत रोषणाई आणि पोवाड्यांची धून
शिवजयंतीनिमित्त नगर परिषदेने शहरात विशेष सजावट केली आहे. पालिका कार्यालय परिसर आणि मार्कंडी येथील अश्वारूढ पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी हे परिसर उजळून निघाले आहेत. तसेच, शहरात ठिकठिकाणी ध्वनिवर्धकावरून शिवरायांचे गुणगान करणारी गीते आणि प्रेरणादायी पोवाडे प्रसारित करण्यात येत असल्याने संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांस्कृतिक मेजवानी: “गर्जा महाराष्ट्र माझा”
शिवजयंतीचे औचित्य साधून सायंकाळी सात वाजता चिपळूण चौपाटी येथे “गर्जा महाराष्ट्र माझा” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची लोककला आणि शिवरायांचा जाज्वल्य इतिहास उलगडणाऱ्या या कार्यक्रमाने चिपळूणकरांची मने जिंकली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 20-02-2026














