चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे (ता. चिपळूण) येथे शुक्रवारी एका भरधाव ईर्टिगा कारने दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात एका ५४ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे चिपळूण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून असुर्डे परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश चंद्रकांत गावडे (वय ४१, रा. मुंबई) हा आपल्या ताब्यातील ईर्टिगा गाडी घेऊन मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. असुर्डे येथे आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने या गाडीने प्रथम एका दुचाकीला आणि त्यानंतर होंडा एलिव्हेट या चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता या भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या चार पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली.
अपघातातील मृतांची व जखमींची नावे
या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत:
- मृत्यू झालेला पादचारी: विजय बाबाराम सावर्डेकर (वय ५४, रा. असुर्डे-रोहिदासवाडी).
- जखमी पादचारी: अंजली पवार, सुभाष जाधव आणि सतीश हुमणे.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि सावर्डे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
असुर्डे गावावर शोककळा
मयत विजय सावर्डेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि भावंडे असा मोठा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा अशा अपघाती निधनामुळे असुर्डे-रोहिदासवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सावर्डे पोलिसात गुन्हा दाखल
या अपघातप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भरधाव वेगाने गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ईर्टिगा चालकावर पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. महामार्गावरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 20-02-2026














