Rajapur: कशेळी ‘सनसेट पॉईंट’चे काम रखडले! निधी मंजूर आणि वर्क ऑर्डर निघूनही प्रशासकीय दिरंगाई; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

राजापूर : राजापूर तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कशेळी गावातील देवघळी बीच (सनसेट पॉईंट) सध्या पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, या पर्यटन स्थळाचा विकास आणि सुशोभीकरणासाठी निधी मंजूर होऊन तसेच वर्क ऑर्डर निघूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून माजी सरपंच दीपक हळदणकर व ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

२५ लाखांचा निधी धूळ खात?

  • आवळचीवाडी येथील देवघळी समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
  • या कामाची वर्क ऑर्डर पतन विभागामार्फत २०२४ मध्येच काढण्यात आली होती.
  • मात्र, वर्ष उलटले तरी प्रत्यक्ष जमिनीवर एकही वीट रचली गेलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

देवघळी बीचवर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु सुविधांचा अभाव असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रत्नागिरी पतन विभाग अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधून आणि प्रत्यक्ष किनाऱ्यावर पाहणी करूनही केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचे माजी सरपंच दीपक हळदणकर यांनी सांगितले.

प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा

कशेळी ग्रामपंचायतीने या संदर्भात पतन विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थांनी टोकाची भूमिका घेतली आहे. “विहित वेळेत काम सुरू न झाल्यास पाण्यात बसून उपोषण करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यापूर्वीचा विकास आणि सध्याची गरज

  • २०१९ मध्ये: मेरीटाईम बोर्डामार्फत सुमारे १ कोटी रुपये खर्चून विकास करण्यात आला होता.
  • सध्याची मागणी: अलीकडच्या काळात रस्ता काँक्रीटीकरण करणे, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह उभारणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे अशी कामे सुचवण्यात आली आहेत.

ठेकेदार आणि अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. शासनाने तातडीने काम सुरू करून पर्यटकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी रास्त मागणी आता कशेळी पंचक्रोशीतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 21-02-2026