युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत अडकलेले संगमेश्वरचे ९ नागरिक सुखरूप, परतीचा प्रवास लांबणीवर

देवरुख : मध्य पूर्वेतील तणावपूर्ण वातावरण आणि दुबई येथील युद्धजन्य परिस्थितीच्या चर्चेमुळे संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, तालुक्यातील सर्व ९ नागरिक दुबईत पूर्णपणे सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

परतीचा प्रवास ४ दिवसांनी पुढे ढकलला

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण व देवरुख येथून सिनीअर ब्रांच मॅनेजर रुची सनी जागुष्टे यांच्या नेतृत्वाखाली ९ जणांचा गट एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा परतीचा प्रवास पुढील ४ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हे सर्व नागरिक दुबईतील ‘फेस्टिवल सिटी’ येथील हॉलिडे इन हॉटेलमध्ये सुरक्षितपणे थांबले आहेत.

अडकलेल्या नागरिकांची नावे:

  • रुची जागुष्टे (सिनीअर ब्रांच मॅनेजर)
  • सनी जागुष्टे (डेव्हलपमेंट ऑफिसर)
  • अभिषेक निमकर (मॅनेजर), मानसी निमकर, जितेंद्र निमकर, रुजुता निमकर
  • ज्योती सप्रे, सुरेश सप्रे (पत्रकार)
  • श्रद्धा इंदुलकर (नगरसेविका, देवरुख)

प्रशासनाचे आवाहन: अफवांवर विश्वास ठेवू नका

दुबईतील स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते अजमल खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक तिथे पूर्णपणे सुरक्षित आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 05-03-2026