मुंबई: क्रिकेट विश्वाचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या घरी सध्या सनई-चौघड्यांचा सूर घुमत आहे. सचिन यांचा मुलगा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आज विवाहबंधनात अडकला आहे. सानिया चंडोक हिच्यासोबत त्याने मुंबईत अत्यंत दिमाखदार सोहळ्यात लग्नाची गाठ बांधली. वरळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला.
लाल रंगाचा लेहेंगा आणि पारंपारिक थाट
आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास अर्जुन आणि सानिया यांचा विवाह संपन्न झाला. या खास प्रसंगी सानिया चंडोकने परिधान केलेल्या लाल रंगाच्या भरजरी लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सानिया या पेहरावात अत्यंत देखणी दिसत होती. दुसरीकडे, अर्जुन तेंडुलकरनेही पारंपारिक वेशभूषेला पसंती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाआधीच्या विधींची (हळद आणि मेहंदी) सोशल मीडियावर मोठी चर्चा होती.
दिग्गजांची मांदियाळी: क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील उपस्थिती
या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी, दिग्गज क्रिकेटपटू, बडे उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. वरळीतील या सोहळ्यात जणू ताऱ्यांची मांदियाळीच अवतरली होती.
उपस्थित प्रमुख पाहुणे:
- क्रिकेट विश्व: सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंह, अजित आगरकर, झहीर खान, आशिष नेहरा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि इरफान पठाण.
- राजकारण: राज ठाकरे, सुप्रिया सुळे, शायना एनसी.
- कला विश्व: शंकर महादेवन, फरहान अख्तर.
सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ
अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लग्नातील विधींचे आणि पाहुण्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या मुलाच्या या ‘ग्रँड’ लग्नाची चर्चा आता संपूर्ण देशभर रंगली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 05-03-2026














