देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथे ग्रामदैवत श्री वाघजाई देवीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंगळवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने होम प्रज्वलित करण्यात आला असून, रंगांची पंचमी असलेल्या दिवसापासून देवीची पालखी घरोघरी दर्शनासाठी फिरणार आहे.
धार्मिक विधी आणि परंपरा
सकाळी सहाणेवर पालखीची विधिवत पूजा गुरव यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थ होम पेटवण्याच्या मुख्य ठिकाणी एकत्र जमले. होमाची पूजा झाल्यानंतर तो प्रज्वलित करण्यात आला. होम पेटताच रूपे लावलेली पालखी होमाभोवती प्रदक्षिणेसाठी धावत आणली गेली.
नविवाहित दांपत्यांचे दर्शन
पालखी प्रदक्षिणा सुरू असतानाच गावातील नविवाहित जोडप्यांनी होमाला तीन प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर पालखी नाचवत पुन्हा सहाणेवर दर्शनासाठी ठेवण्यात आली. या ठिकाणी सार्वजनिक गाऱ्हाणे घालून आणि प्रसाद वाटप करून सकाळच्या कार्यक्रमाची सांगता झाली. रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 05-03-2026














