रत्नागिरी: जागतिक राजकारणातील तणाव आणि युद्धाच्या छायेमुळे सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली असून, गेल्या अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या भावात ३० हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. रत्नागिरीत २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ६३ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
युद्धाचे पडसाद थेट बाजारपेठेवर
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध पेटल्यामुळे जागतिक स्तरावर भीतीचे वातावरण आहे. याचे थेट परिणाम केवळ शेअर बाजारावरच नव्हे, तर दैनंदिन वस्तू, पेट्रोल, डिझेल आणि प्रामुख्याने सोन्या-चांदीच्या दरांवर दिसत आहेत. मागील तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत झालेली ही वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारी ठरत आहे.
रत्नागिरीतील ताज्या दरांवर एक नजर
रत्नागिरीतील सराफ बाजारात सध्या सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत:
| धातू / प्रकार | सध्याचा दर |
| सोने २४ कॅरेट (प्रति तोळा) | ₹ १,६३,५४१ |
| सोने २२ कॅरेट (प्रति तोळा) | ₹ १,५०,००० |
| चांदी (प्रति किलो) | ₹ २,८८,००० |
सहा वर्षांतील दरांचा तुलनात्मक प्रवास
सोन्या-चांदीच्या दरात मागील काही वर्षांत झालेली वाढ थक्क करणारी आहे:
- २०१९: सोने ₹ ३७,००० (प्रति १० ग्रॅम), चांदी ₹ ४२,००० (प्रति किलो).
- २०२०: सोने ₹ ४८,७०० (प्रति १० ग्रॅम), चांदी ₹ ५९,००० (प्रति किलो).
- २०२४ (मार्च): गेल्या वर्षी याच काळात सोने ₹ ८९,००० होते.
- २०२६ (आजचा भाव): सोन्याने थेट ₹ १,६३,२४१ चा आकडा गाठला आहे.
शिमगोत्सवातही खरेदीचा उत्साह
वाढत्या दरांचा परिणाम खरेदीवर होईल असे वाटत असतानाच, रत्नागिरीत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. शिमगोत्सवाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, सण आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा कल सोने खरेदीकडेच आहे.
“इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी सोने स्वस्त होण्याची वाट न पाहता, गुंतवणूक म्हणून थोडे थोडे सोने खरेदी करत राहावे. दराची स्थिती अशीच राहिली तर भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.”
— अमेय वीरकर, अध्यक्ष, सराफ संघटना, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 05-03-2026














