रत्नागिरी: २५ दिवसांत मिळणार गॅस सिलिंडर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन

रत्नागिरी:
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठ्याबाबत समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. “४५ दिवसांत गॅस मिळणार ही बातमी चुकीची असून, प्रत्येक ग्राहकाला २५ दिवसांच्या आत गॅस पुरवठा झालाच पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सीला अचानक भेट
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरीतील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापन आणि उपस्थित ग्राहकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी गॅस वितरणाची पाहणी व पडताळणी केली. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी ‘पॅनिक’ होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

४५ दिवसांची बातमी अफवा; शासनाचे नियम काय?
सोशल मीडियावर गॅस वितरणासाठी ४५ दिवस लागतील, अशा बातम्या पसरल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, “शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की ग्राहकाला २५ दिवसांत सिलिंडर मिळाला पाहिजे. ४५ दिवसांबाबत एजन्सीमध्ये असलेली तांत्रिक अडचण आजच निकाली काढण्यात येईल.”

गॅस एजन्सींना कडक सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सी व्यवस्थापनाला खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:

दर्शनी भागात फलक: बुकिंग संदर्भातील सर्व माहिती देणारा फलक एजन्सीच्या मुख्य भागात लावावा.

ग्राहक संवाद: ग्राहकांचे फोन उचलून त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावीत आणि त्यांच्या शंकांचे निरसन करावे.

नियोजन: प्रलंबित बुकिंगची यादी कमी करण्यासाठी चोख नियोजन करावे.

बॅाक्स: मदतीसाठी येथे संपर्क साधा
नागरिकांना गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार किंवा समस्या असल्यास प्रशासनाने मदतीसाठी क्रमांक जाहीर केला आहे:

जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक: ७०५७२२२२३३

बुकिंगसाठी सुलभ पर्याय: सिलिंडर बुकिंगसाठी ग्राहकांनी गॅस एजन्सीच्या व्हॉट्स ॲप (WhatsApp) क्रमांकाचा वापर करावा. या क्रमांकाची माहिती ग्राहकांच्या गॅस बुकमध्ये उपलब्ध आहे.

या भेटीवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गॅस टंचाईच्या अफवांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 14-03-2026