खेडमध्ये एसटी चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण! दोन तरुणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी (खेड): खेड शहरात गुरुवारी मध्यरात्री एका एसटी चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश (अप्पर-डिप्पर) कमी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन तरुणांनी एसटी चालकाला बसमधून ओढून जखमी केले. याप्रकरणी खेड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शरद महादेव माने (वय ४२, रा. सांगली, सध्या रा. रोहा एसटी आगार) हे रोहा आगाराची एसटी बस (क्र. MH 14 KQ 3970) चिपळूणहून खेडच्या दिशेने घेऊन येत होते. १६ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे ही घटना घडली.

अप्पर-डिप्परचा इशारा भोवला!

एसटी बस समोरून येत असताना समोरून एक टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (क्र. MH 46 AU 3717) गाडी येत होती. या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश अत्यंत प्रखर असल्याने चालक माने यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. त्यांनी समोरच्या गाडीला प्रकाश कमी करण्यासाठी ‘अप्पर-डिप्पर’चा इशारा दिला. मात्र, समोरच्या गाडीतील तरुणांना याचा राग आला.

चालकाला बसमधून ओढून मारहाण

आरोपी सनी संजय नलावडे आणि कौस्तुभ पाटणे (दोघेही रा. खेड) यांनी गाडीचा प्रकाश कमी करण्याऐवजी थेट एसटी बस अडवली. त्यांनी ड्रायव्हर बाजूचा दरवाजा उघडून चालक शरद माने यांना जबरदस्तीने बाहेर ओढले. त्यांना जमिनीवर पाडून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात माने यांच्या उजव्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल

आपल्या कर्तव्यावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सनी नलावडे आणि कौस्तुभ पाटणे यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपास: या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर चालकांमध्ये होणारे असे वाद चिंतेचा विषय ठरत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 18-03-2026