खेड: लोटे औद्योगिक वसाहतीतील स्फोटातील आणखी दोन कामगारांचा मृत्यू

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्ट्रीयल केमिकल कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या सुजल दास (२९, रा. आवाशी), असद खान (४४, रा. घाणेखुंट) या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ३ वर पोहोचली आहे.

गेल्या ३० वर्षांपासून लोटे औद्योगिक वसाहतीत कार्यान्वित असलेल्या डॉ. खान इंडस्ट्रीयल कंपनीत इथॉईल सिलिकेट हे रसायन बनवण्याचे काम केले जाते. ६ मार्च रोजी रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन ११ कामगार होरपळले होते. यातील सुजल दास, असद खान, नंदकिशोर कृष्णा राणे, रणजीत राणे, रघुनाथ खामकर या ५ गंभीर जखमींवर ऐरोली-मुंबई येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. याठिकाणी उपचार सुरू असतानाच चौथ्या दिवशी रघुनाथ बंडू खामकर (रा. मुरडे-शिंदेवाडी, खेड) या कामगाराचा मृत्यू झाला होता, त्यानंतर उपचार सुरू असतानाच सुजल दास, असद खान यांचाही मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कंपनी मालकासह चौघांवर निष्काळजीपणासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा येथील पोलिस् ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. १२ दिवसांचा कालावधी लोटून देखील अजूनही स्फोटाच्या नेमक्या कारणांचा उलगडाच झालेला नाही. स्फोटाचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण येवले करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 18-03-2026