खेड (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात भाजावळ करत असताना अचानक चक्कर आल्याने एक वृद्ध व्यक्ती थेट आगीत पडली. या आगीत गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण निळीक गावावर शोककळा पसरली आहे.
नक्की घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बशीर महामूद चौगुले (वय ६५ वर्षे, रा. निळीक मोहल्ला, ता. खेड) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रविवारी, २२ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४:३० च्या दरम्यान ही घटना घडली. चौगुले हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतीच्या कामासाठी आणि शेतातील कचरा जाळण्यासाठी (भाजावळ) खलाटी परिसरात गेले होते.
दुपारच्या सुमारास प्रचंड उष्मा असल्याने त्यांना अचानक चक्कर आली आणि ते थेट पेटवलेल्या भाजावळीच्या आगीत कोसळले. आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांच्या अंगावरील कपड्यांनी तत्काळ पेट घेतला आणि ते गंभीररित्या भाजले गेले.
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
शेजारी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही घटना पाहताच तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली होती. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सध्या याप्रकरणी ‘अकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद केली असून, घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत. उन्हाचा वाढता पारा आणि शेतातील कामे करताना घ्यावयाची काळजी यावर आता परिसरात चर्चा सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 25-03-2026














