Khed: शिरगाव ग्रामपंचायतीत ३ कोटींचा भ्रष्टाचार? ग्रामसेवक, सरपंच आणि ठेकेदारावर खळबळजनक आरोप!

खेड (रत्नागिरी): खेड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे ३ कोटी ५०० रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ग्रामसेवक, सरपंच आणि ठेकेदार यांनी संगनमताने हा ‘सावळा गोंधळ’ घातल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्त्याचे प्रशासनाला आव्हान

शिरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते काशिराम भोसले यांनी या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला आहे. त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भोसले यांच्या दाव्यानुसार, ग्रामपंचायतीच्या निधीचा विनियोग करताना नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.

भ्रष्टाचाराचे धक्कादायक नमुने:

काशिराम भोसले यांनी निवेदनात काही विशिष्ट उदाहरणे नमूद केली आहेत:

  • बंद शाळेसाठी टीव्ही खरेदी: बागवाडी जिल्हा परिषद शाळा ३० मे २०२१ रोजी पूर्णपणे बंद झाली आहे. असे असतानाही, ११ ऑक्टोबर २०२३ रोजी या शाळेसाठी २४ हजार रुपये किमतीचा स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे.
  • बोगस बिले: अमोल बापू पवार या नावाने अशा प्रकारची सुमारे ३० बनावट बिले अदा करण्यात आल्याचा आरोप आहे.
  • धोबीघाट बांधकामात तफावत: पिंपळवाडी येथे २ लाख ३६ हजार २५० रुपये खर्चून धोबीघाट बांधल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या कामाची किंमत ५० हजार रुपयांच्या वर नसल्याचे दिसत आहे. हे काम ठेकेदार अमोल मच्छिंद्र जाधव यांच्या नावे दाखवण्यात आले आहे.
  • हर घर जल योजनेचा फज्जा: गावात ३ कोटी रुपयांची ‘हर घर जल’ योजना राबवण्यात आली, परंतु आजही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

१२ वर्षांचा कार्यकाळ संशयाच्या भोवऱ्यात

शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सध्या शिरगाव युवा प्रतिष्ठानची सत्ता आहे. प्रभारी ग्रामसेवक अजित पवार हे गेल्या १२ वर्षांपासून याच ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रदीर्घ कार्यकाळ आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, प्रशासकीय स्तरावर त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Shree krushn shreekhand

या गंभीर आरोपांमुळे खेड तालुक्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रशासन या प्रकरणाची कशा प्रकारे चौकशी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 25-03-2026