रत्नागिरी: मिरकरवाडा जेटीवर राबणाऱ्या नेपाळी खलाशाचा बोटीवरच आकस्मिक मृत्यू; मासेमारी करून परतताना घडली घटना

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मासेमारी करून जेटीवर परतत असताना ही घटना घडली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नक्की काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, घनबहादूर गुड्डूराम थारू (वय ५६, मूळ रा. कैलाली, नेपाळ; सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. घनबहादूर हे मिरकरवाडा येथील ‘मजर उम्मर मुकादम’ यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होते.

२० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते बोटीसह मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. २२ मार्च रोजी सकाळी मासेमारी पूर्ण करून बोट मिरकरवाडा जेटीकडे परतत होती. यावेळी घनबहादूर बोटीवर झोपलेले होते.

झोपेतच संपली प्राणज्योत

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बोट मिरकरवाडा जेटीला लागली. बोटीवरील इतर कामगार मासे (मच्छी) उतरवण्याचे काम करत होते. बराच वेळ झाला तरी घनबहादूर उठले नाहीत, म्हणून सहकारी कामगार त्यांना उठवण्यासाठी गेले. मात्र, त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. हे पाहून कामगारांनी तातडीने बोट मालकाला माहिती दिली.

त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, २२ मार्च रोजी सकाळी ११:२५ वाजण्याच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती घनबहादूर यांचे जावई तुलसीदार बुद्धीराम डंगो यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 25-03-2026