Guhagar : गिमवी येथे रानडुकराची शिकारीप्रकरणी तिघेजण वनविभागाच्या ताब्यात

गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गिमवी येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी चिपळूण वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका विना नंबर प्लेटच्या टेम्पोसह शिकारीसाठी वापरलेली बंदूक आणि तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी मौजे गिमवी येथील गाव हद्दीत एक संशयास्पद ४०७ टेम्पो विना नंबर प्लेटचा आढळून आला. वनविभागाच्या पथकाने या वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या हौद्यामध्ये शिकार करून ठेवलेले रानडुक्कर आणि एक डबल बार १२ बोर बंदूक मिळून आली.

शिकारीप्रकरणी तिघांना अटक

या प्रकरणी वनविभागाने तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. प्रसाद सुभाष सोमण २. रोशन रमेश मोरे ३. संदीप वसंत गावडे (सर्व राहणार: गिमवी, ता. गुहागर)

वनविभागाची धडक कारवाई

वनविभागाने मृत रानडुक्कर, ४०७ टेम्पो आणि बंदूक जप्त केली असून, आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान, गुहागर वनपाल अमित निमकर, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, अरविंद मांडवकर, कुमार पवार, राहुल गुंठे आणि कृष्णा इरमले यांचा सहभाग होता.

सध्या या प्रकरणाचा पुढील अधिक तपास वनविभागामार्फत सुरू आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या वाढत्या घटना पाहता वनविभागाने गस्त वाढवली असून शिकारी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 25-03-2026