रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज एक मोठी कारवाई करत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह एका कनिष्ठ लिपिकाला २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. कपात केलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी ३ लाख ४० हजारांची मागणी करून तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारणे या दोन्ही लोकसेवकांना महागात पडले आहे. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोणाविरुद्ध झाली कारवाई?
१) गणेश हरीदास सलगर (वय ३६): कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, कुवारबाव. (वर्ग १ अधिकारी) २) शेखर चंद्रमणी पवार (वय ३९): कनिष्ठ लिपिक टंकलेखक, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, कुवारबाव. (वर्ग ३ कर्मचारी)
नेमकी घटना काय?
तक्रारदार हे कन्स्ट्रक्शन व्यवसायात असून त्यांना मंडणगड तालुक्यातील ल.पा. योजना भोळवली येथील धरण मातीवरील उपाययोजना आणि गळती बंद करण्याचे काम देण्यात आले होते. तक्रारदारांनी हे काम पूर्ण केले होते. या कामाच्या अंतिम देयकातून (Final Bill) ११,३०,८९३/- रुपये कपात करण्यात आले होते. ही कपात केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी तक्रारदारांनी कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांची भेट घेतली होती.
सदर रक्कम परत मिळवून देण्याच्या बदल्यात कार्यकारी अभियंता सलगर यांनी १८ मार्च २०२६ रोजी तक्रारदाराकडे ३ लाख ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी २७ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी ACB कार्यालयात धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली.
ACB चा सापळा आणि अटक
तक्रारीची शहानिशा करण्यासाठी शुक्रवारी (२७ मार्च) दोन पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. तडजोडीनंतर लाचेची रक्कम २ लाख रुपये निश्चित झाली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान, कार्यकारी अभियंता सलगर यांनी लाचेची रक्कम लिपिक शेखर पवार याच्याकडे देण्यास सांगितले.
सलगर यांच्या सांगण्यावरून लिपिक पवार याने स्वतःच्या आणि सलगर यांच्या फायद्यासाठी तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारले. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ACB पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. सध्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या पथकाने केली यशस्वी कारवाई
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक श्री. अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पथकामध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे, उदय चांदणे, संजय वाघाटे, विशाल नलावडे, दिपक अबिकर, राजेश गावकर आणि हेमंत पवार यांचा समावेश होता. या पथकाने या सापळ्यासाठी प्रचंड मेहनत घेत लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- टोल फ्री क्रमांक: १०६४
- संपर्क: ०२३५२/२२२८९३, ७५८८९४१२४७
- व्हॉट्सॲप: ७०३८३९१०६४
- ईमेल: acbratnagiri@gmail.com













