रत्नागिरी: जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह तिघे जखमी; बाप-लेकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी चव्हाणवाडी येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये रक्ताचा खेळ झाला आहे. किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले असून, यात एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार, २८ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी सुरेश सिताराम चव्हाण (वय ६३) यांच्या अंगणातील एका वादग्रस्त जागेवर त्यांचे लहान भाऊ गुरुनाथ सिताराम चव्हाण आणि पुतण्या त्रिनेत्र गुरुनाथ चव्हाण हे सिमेंट काँक्रीटचे काम करत होते.

सुरेश चव्हाण यांनी या कामाला विरोध दर्शवला. “जागेचा वाद मिटल्याशिवाय काम करू नका,” असे सांगताच आरोपींचा संयम सुटला आणि वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.


गरोदर महिलेलाही सुटेना दया; कुदळीच्या दांड्याने मारहाण

आरोपी गुरुनाथ चव्हाण याने संतापून हातातील कुदळीच्या लोखंडी पाईपच्या दांड्याने सुरेश चव्हाण यांच्या उजव्या हातावर, पाठीवर आणि कमरेवर जबर प्रहार केले. इतक्यावरच न थांबता दोन्ही आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवले.

यावेळी सुरेश यांचा मुलगा सुमित वडिलांना वाचवण्यासाठी धावला असता, त्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. आपल्या पतीला आणि साऱ्यांना वाचवण्यासाठी सुमितची पत्नी स्पृहा चव्हाण पुढे आली. स्पृहा या ७ महिन्यांच्या गरोदर असतानाही आरोपींनी त्यांच्यावर हात उचलला. झटापटीत कुदळीचा दांडा स्पृहा यांच्या पोटाला लागला, तर सुमित गडावरून खाली पडल्याने त्याच्या पाठीला आणि पायाला गंभीर मुका मार लागला आहे.


भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल

या रक्ताळलेल्या संघर्षानंतर सुरेश चव्हाण यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी गुरुनाथ चव्हाण आणि त्रिनेत्र चव्हाण यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:

  • कलम ११८(१): धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे.
  • कलम ११५(२): स्वेच्छेने दुखापत करणे.
  • कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे.
  • कलम ३(५): समान हेतूने केलेले कृत्य.

पोलीस तपास सुरू

कौटुंबिक वादातून झालेल्या या घटनेमुळे काजरघाटी परिसरात खळबळ माजली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी स्वतःच्याच भावाच्या कुटुंबावर आणि गरोदर महिलेवर झालेला हा हल्ला निंदनीय मानला जात आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींवर कडक कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 31-03-2026