Lanja: डुकराच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

लांजा (प्रतिनिधी): वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर आता जीवघेणा ठरू लागला आहे. लांजा तालुक्यातील आसगे-तळवडे-दाभोळे मार्गावर बेनी नदीच्या वळणाजवळ डुकराने मोटारसायकलला दिलेल्या भीषण धडकेत आसगे येथील कलिंगड उत्पादक शेतकरी दिनकर मांडवकर (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात वन्य प्राण्यांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर मांडवकर हे शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व असून गेल्या दोन वर्षांपासून ते कलिंगड शेतीतून उत्तम उत्पन्न घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कलिंगडाचा टेम्पो पुढे पाठवून स्वतः मोटारसायकलने पाठीमागून आसगेच्या दिशेने येत होते.

बेनी नदीच्या वळणावर अचानक एका रानडुक्कर त्यांच्या समोर आले आणि त्याने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, मांडवकर थेट रस्त्याशेजारील गटारात जाऊन पडले, तर त्यांची मोटारसायकल रस्त्यावरच फेकली गेली.

रिक्षाचालकामुळे मिळाला जीवदान

अपघातानंतर काही वेळाने त्याच मार्गावरून आसगे येथील एक रिक्षा व्यावसायिक जात होते. त्यांना रस्त्यावर मोटारसायकल पडलेली दिसल्याने त्यांनी रिक्षा थांबवून शोध घेतला असता, मांडवकर हे गंभीर जखमी अवस्थेत गटारात पडलेले आढळले. त्यांनी तातडीने मांडवकर यांच्या कुटुंबीयांना पाचारण केले. सध्या त्यांच्यावर रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वनविभागाच्या दुटप्पी भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप

या घटनेनंतर आसगे मांडवकरवाडी येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की:

“जर एखाद्या शेतकऱ्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्याला ठार मारले, तर वनविभाग तातडीने गुन्हे दाखल करतो. मग आता डुकराच्या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला वनविभाग नुकसान भरपाई देणार का?”

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

कोकणात सध्या बागायती आणि शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्यातच आता मानवी जीवही धोक्यात आल्याने भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन जखमी शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी आणि या मार्गावरील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी लांजा तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 02-04-2026