देवरुख (रत्नागिरी): संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरात एका संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर भररस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाला देवरुख पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो संगमेश्वर पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ एप्रिल रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या सुमारास घडली. पीडित विद्यार्थिनी देवरुख येथील आपला संगणक वर्ग संपवून एस.टी. बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीच्या दिशेने जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून (MH-08-AU-2127) आलेल्या आरोपीने त्यांचा पाठलाग सुरू केला.
भररस्त्यात निर्लज्जपणाचा कळस
मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आरोपीने आधी आपली दुचाकी थांबवून विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन, चालत्या दुचाकीवर उभे राहून त्याने अत्यंत अश्लील कृत्य केले. या अनपेक्षित प्रकारामुळे अल्पवयीन मुली प्रचंड घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, लोक जमा होण्यापूर्वीच आरोपी दुचाकीवरून पसार झाला.
पालकांचा धीर आणि पोलिसांची तत्परता
भयभीत झालेल्या विद्यार्थिनींनी घरी पोहोचताच पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी मुलींना धीर देत २ एप्रिल रोजी देवरुख पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी सूत्रे हलवून संशयित आरोपी हर्षल गवंडी याला ताब्यात घेतले.
‘पोक्सो’सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
देवरुख पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई केली आहे. आरोपीविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
- भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ७८, ७९.
- पोक्सो कायदा (POCSO Act): बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२.
सरकारी कर्मचाऱ्याच्या कृत्यामुळे संताप
आरोपी हा संगमेश्वर पंचायत समितीसारख्या जबाबदार ठिकाणी लिपिक म्हणून काम करत असल्याने, या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. एका सरकारी कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारचे नीच कृत्य केल्याने महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस निरीक्षक उदय झावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 04-04-2026














