रामपूर खून प्रकरणात तिसरा संशयित अटकेत; मुख्य आरोपीवर बलात्काराचाही गुन्हा!

चिपळूण: मुंबईतील मालाड येथील एजाज कुरेशी खून प्रकरणाचा गुंता आता सुटू लागला असून, चिपळूण पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सागर संतोष बिरीत (३२, रा. रेहळे भागाडी, चिपळूण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या अटकेमुळे या खळबळजनक प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता ३ झाली आहे.

मानवी हाडे आणि अंगठीने उघडले खुनाचे गूढ

रामपूर येथील एका आंबा बागेत काही दिवसांपूर्वी अर्धवट जळालेली मानवी हाडे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. चिपळूण पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने तपास केला. वैद्यकीय अहवालात ती हाडे मानवी असल्याचे स्पष्ट झाले, तसेच घटनास्थळी सापडलेली अंगठी आणि दातांमुळे हा घातपात असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी जमिनीच्या मालकी हक्काचा आधार घेत तपासाची चक्रे फिरवली आणि ते मुख्य सूत्रधार विशाखा खोडदेकर पर्यंत पोहोचले.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

तपासादरम्यान समोर आले की, विशाल खोडदेकर आणि त्याच्या मैत्रिणीने मिळून मालाड येथील एजाज कुरेशी यांचा खून केला. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चिपळूणमधील रामपूर येथील स्वतःच्या जागेत आणला आणि तिथे तो जाळला. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आणि तो जाळण्यात सागर बिरीत याने विशालला मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी न्यायालयाने सागरला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्य आरोपी विशाल खोडदेकरवर बलात्काराचाही गुन्हा

खून प्रकरणात अडकलेल्या विशाल खोडदेकरचा गुन्हेगारी इतिहास आता समोर येत आहे. त्याच्यावर केवळ खुनाचाच नाही, तर चार महिन्यांपूर्वी सावर्डे पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सावर्डे पोलीस गेल्या चार महिन्यांपासून त्याच्या शोधात होते.

Tata sierra

पुढे काय?

सध्या विशाल खोडदेकर हा खून प्रकरणात चिपळूण पोलिसांच्या कोठडीत आहे. या प्रकरणाची चौकशी आणि तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतर सावर्डे पोलीस बलात्काराच्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेणार आहेत. एका खुनाच्या तपासामुळे जुन्या गुन्ह्यातील आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 04-04-2026