खेड: कंपनीच्या हलगर्जीपणाने महिलेचा बळी; गरम केमिकलयुक्त मातीत रुतून दुर्दैवी अंत

खेड (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ‘पुष्कर’ कंपनीने सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून उघड्यावर टाकलेल्या गरम केमिकलयुक्त मातीमध्ये रुतून एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तब्बल १० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या महिलेचा उपचारादरम्यान अंत झाला. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकी घटना काय?

चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात राहणाऱ्या शकुंतला बबन सोनवणे (वय ४८) या १२ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास आपल्या चुलत सुनेसोबत कचरा गोळा करण्यासाठी लोटे येथील ‘पुष्कर’ कंपनीच्या बाहेरील परिसरात गेल्या होत्या. कंपनीने प्रक्रियेनंतर निघालेली अत्यंत गरम आणि रसायने मिश्रित माती कोणत्याही सुरक्षेविना उघड्यावर टाकली होती.

या मातीचा ढिगारा वरून सामान्य दिसत असला तरी आतून ती प्रचंड गरम होती. शकुंतला यांचा पाय या ढिगाऱ्यावर पडला आणि त्या थेट कमरेपर्यंत आत रुतल्या गेल्या. ही माती इतकी ज्वलनशील होती की, काही क्षणांतच त्यांची साडी आणि कपडे जळून खाक झाले.

१० दिवसांची मृत्यूशी झुंज

या भीषण अपघातात शकुंतला सोनवणे यांचा कमरेपासून खालचा भाग आणि दोन्ही हात गंभीररीत्या भाजले होते. त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सी.पी.आर. (CPR) रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्याने २२ मार्च रोजी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.


कंपनी प्रशासनावर गुन्हे दाखल

याप्रकरणी मृताची चुलत सून ललिता चंद्रकांत सोनवणे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कंपनीने अशा प्रकारे घातक कचरा उघड्यावर टाकल्याने कोणाचाही जीव जाऊ शकतो, याची जाणीव असूनही अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी खालील व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे:

  • गौतम मखारीया (मालक)
  • सुधाकर जगताप (सेफ्टी मॅनेजर, प्लांट नं. १)
  • सचिन रामकृष्ण मनवाल (एच.आर. मॅनेजर)
  • रविंद्रकुमार सावरमल भुतिया (कमर्शियल मॅनेजर)
  • आणि इतर संबंधित व्यवस्थापक.

कलम: भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


लोटे एमआयडीसीमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुष्कर कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे स्थानिक परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोटे एमआयडीसीमधील अनेक कंपन्या अशा प्रकारे घातक आणि ज्वलनशील कचरा सुरक्षित विल्हेवाट न लावता उघड्यावर टाकत असल्याचे बोलले जात आहे.

“हा केवळ अपघात नसून कंपनी प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. अशा कंपन्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत आता प्रशासनावर दबाव वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 04-04-2026