रत्नागिरी: क्रेडिट कार्डचा विमा बंद करण्याच्या बहाण्याने तरुणाला ८७ हजारांचा गंडा

Ratnagiri Cyber Crime News: रत्नागिरी शहरात सायबर भामट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एका दुचाकी शोरूममधील कर्मचाऱ्याची तब्बल ८७ हजार ६४२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. टीआरपी (TRP) परिसरातील यामाहा शोरूममध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद रघुनाथ यादव (वय ३१, रा. नाचणे, रत्नागिरी) हे शहरातील टीआरपी येथील एका नामांकित दुचाकी शोरूममध्ये कामाला आहेत. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० ते १:१५ च्या दरम्यान ते कर्तव्यावर असताना, त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला.

संशयित आरोपीने ‘एसबीआय क्रेडिट कार्ड’ (SBI Credit Card) विभागातून बोलत असल्याचे भासवले. त्याने प्रसाद यांच्या क्रेडिट कार्डवरील इन्शुरन्स (विमा) बाबत विचारणा केली आणि हा विमा ‘डिॲक्टिव्हेट’ (बंद) करण्याची प्रक्रिया सांगण्याच्या बहाण्याने त्यांना जाळ्यात ओढले.

व्हॉटसॲप लिंकचा वापर करून फसवणूक

भामट्याने प्रसाद यांच्या व्हॉटसॲपवर एक लिंक पाठवली. विमा बंद करण्यासाठी या लिंकवरील ॲपमध्ये वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. प्रसाद यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरली असता, काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ८७ हजार ६४२ रुपये परस्पर वळवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसाद यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस अंमलदार करत आहेत.

रत्नागिरीकरांनो सावधान!

सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या लढवून सर्वसामान्यांना लुटत आहेत. खालील गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे:

  • अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.
  • बँकेशी संबंधित कोणतीही माहिती किंवा ओटीपी (OTP) कोणालाही शेअर करू नका.
  • इन्शुरन्स किंवा कार्ड बंद करण्याच्या नावाखाली जर कोणी वैयक्तिक माहिती मागत असेल, तर थेट बँकेच्या शाखेत जाऊन खातरजमा करा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 08-04-2026