“विश्वगुरु शब्दांचे बॉम्ब टाकण्यात व्यस्त, तर तिकडे पाकिस्तान-चीनने युद्ध थांबवलं”; संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका

Sanjay Raut Slams PM Modi: रशिया-युक्रेन आणि आता अमेरिका-इराण संघर्षावरून जागतिक राजकारण तापलेले असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. “जगातील युद्ध थांबवण्यासाठी ज्या ‘विश्वगुरु’ प्रतिमेचा डांगोरा पिटला जात होता, ते पंतप्रधान आता सपशेल अपयशी ठरले आहेत,” अशा शब्दांत राऊतांनी निशाणा साधला.

‘विश्वगुरु’ केवळ राजकीय विरोधकांवर बॉम्ब टाकण्यात मग्न

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “जगभरात युद्ध सुरू असताना आपल्या महाविश्वगुरुंनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. ते केवळ केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये जाऊन राजकीय विरोधकांवर शब्दांचे बॉम्ब टाकत होते. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि उपराष्ट्रपतींच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचे काम सुरू आहे, पण जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घेतला नाही.”

श्रेय चीन आणि पाकिस्तानच्या झोळीत

अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्याचे आणि मध्यस्थीचे श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतल्याचा दावा राऊतांनी केला.

  • अपयशाची चपराक: “जे काम भारताने करायला हवे होते, ते आता पाकिस्तान करत आहे. डोनाल्ड ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि नेत्यानाहू यांना एका मंचावर आणण्याचे श्रेय मोदींना मिळायला हवे होते, पण तसे घडले नाही. ही भारतासाठी लाजिरवाणी बाब आहे,” असे राऊत म्हणाले.
  • इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा: “ज्या इस्लामाबादमध्ये तुम्ही तिरंगा फडकवण्याच्या गप्पा मारत होतात, तिथे आता ट्रम्प आणि इराणचे नेते बसून शांततेवर चर्चा करणार आहेत. ही भारताला मारलेली चपराक आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

इराणने झुकवल्या अमेरिकेच्या मान्या

इराणच्या लढ्याचं कौतुक करताना राऊत म्हणाले की, इराणसारखा छोटा देश अमेरिकेला शरण गेला नाही. ३५ दिवसांहून अधिक काळ त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला झुंजवत ठेवले. डोनाल्ड ट्रम्पसारख्या ‘झुंड राष्ट्र प्रमुखाला’ इराणने धडा शिकवला असून, राज्यकर्त्यांनी देशासाठी कसं बलिदान द्यावं, याचं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे.

ऑपरेशन सिंदूरवरून भाजपला टोला

भाजपच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि अखंड भारताच्या मुद्द्यावरून राऊतांनी खिल्ली उडवली. “तुम्ही ज्या पाकिस्तानात घुसून कारवाई करण्याच्या गोष्टी करत होतात, त्याच पाकिस्तानच्या मध्यस्थीसाठी ट्रम्प आता त्यांना ‘थँक्यू’ म्हणत आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण किती रसातळाला गेले आहे, हेच यातून स्पष्ट होते,” अशी टीका त्यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 08-04-2026