Ratnagiri Zilla Parishad Committee Election: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सदस्य निवडीचा पेच अखेर मिटला आहे. सुरुवातीला विरोधी सदस्यांनी विविध समित्यांसाठी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक रंगणार अशी चिन्हे होती. मात्र, राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या आवाहनानंतर विरोधकांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, सर्व समित्यांची निवड बिनविरोध झाली असून, सत्तेच्या गणितात विरोधकांच्या पदरातही महत्त्वाची पदे पडली आहेत.
अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांच्या उपस्थितीत पार पडली सभा
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सदस्य निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपाध्यक्ष विलास चाळके यांच्यासह सर्व सभापती उपस्थित होते. स्थायी, जलव्यवस्थापन, बांधकाम, समाजकल्याण अशा महत्त्वाच्या समित्यांसाठी विरोधकांनी अर्ज भरल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.
सामंत यांची ‘फोन डिप्लोमसी’ आणि विरोधकांचा प्रतिसाद
अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आणि पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांनी विरोधी सदस्यांशी चर्चा केली. याच दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधी सदस्य विक्रांत जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पालकमंत्र्यांच्या विनंतीचा मान राखत विरोधकांनी लवचिक भूमिका घेतली.
काय ठरले तडजोडीत?
- सुरुवातीला विरोधी सदस्य ‘स्थायी समिती’साठी आग्रही होते, मात्र चर्चेअंती त्यांना ‘बांधकाम समिती’ देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला.
- ठाकरे गटाचे प्रमोद निवळकर यांची बांधकाम आणि कृषी समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागली.
- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय बिरवटकर यांनी आरोग्य समितीबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर, त्यांची समिती बदलून त्यांनाही बांधकाम व कृषी समितीचे सदस्यत्व देण्यात आले.
राजकीय समन्वय आणि बिनविरोध निवड
या तडजोडीनंतर विरोधी सदस्य विक्रांत जाधव, संतोष थेराडे, नेहा माने, प्रमोद निवळकर, प्रमोद गांधी आणि श्रीमती कुवळेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे जिल्हा परिषदेतील वातावरण खेळीमेळीचे झाले आणि अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सर्व समित्यांच्या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली.
या बिनविरोध निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात आता गतिशीलता येण्याची शक्यता असून, विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 08-04-2026











