रत्नागिरीत पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचा धडाका! नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे ॲक्शन मोडमध्ये; दोन महिने आधीच कामाला सुरुवात

रत्नागिरी: पावसाळ्यात शहर जलमय होऊ नये आणि पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने यंदा कंबर कसली आहे. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीच नालेसफाईच्या कामाला धडाक्यात सुरुवात झाली असून, त्यांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

यंदा पावसाळ्याची वाट न पाहता नियोजन

दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की घाईघाईने नालेसफाईची कामे उरकली जातात. यामुळे अनेकदा कामे अपूर्ण राहतात आणि पावसाळ्यात नाले तुंबून शहरात पाणी शिरण्याच्या तक्रारी वाढतात. हीच बाब लक्षात घेऊन, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यंदा दोन महिने आधीच नियोजन करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.

मांडवी परिसरापासून मोहिमेचा प्रारंभ

नालेसफाईच्या या मोहिमेचा शुभारंभ मांडवी भागातून करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने:

  • सदानंद वाडी
  • चौगुले वाडी
  • तोरण नाला या ठिकाणच्या नाल्यांची सफाई युद्धपातळीवर सुरू आहे. नाल्यांमध्ये वाढलेली झाडे-झुडपे, साचलेला गाळ आणि कचरा काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करून दिला जात आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती कमी होणार आहे.

प्लास्टिकमुक्तीसाठी जनजगृतीवर भर

नालेसफाईसोबतच शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेतर्फे प्लास्टिक विरोधी मोहीमही अधिक तीव्र करण्यात आली आहे. पावसाळ्यात नाले तुंबण्याचे मुख्य कारण प्लास्टिक कचरा असल्याने, नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.

नगराध्यक्षांच्या कामाची शहरात चर्चा

वेळेआधीच काम सुरू करण्याच्या नगराध्यक्षांच्या ‘धडाकेबाज’ कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील सर्व प्रमुख आणि लहान नाले पूर्णपणे स्वच्छ करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.