रत्नागिरी: रत्नागिरी शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आता ‘प्लास्टिक मुक्ती’वर आपला मोर्चा वळवला आहे. शहरात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेत रत्नागिरी शहर व्यापारी महासंघासोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
व्यापाऱ्यांचे प्रबोधन आणि प्रेझेंटेशन
बैठकीच्या सुरुवातीला नगरपालिकेतर्फे एक सविस्तर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यामध्ये प्लास्टिक बंदी का आवश्यक आहे, कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वस्तू पर्यावरणाला घातक आहेत आणि कोणत्या वस्तूंवर नेमकी बंदी आहे, याची तांत्रिक माहिती देण्यात आली. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि मुख्याधिकारी गारवे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
नमुना पिशव्यांचे सादरीकरण होणार
बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वैधतेबाबत काही शंका उपस्थित केल्या. बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्या पिशव्या वापरता येतील, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी नगरपालिकेतर्फे लवकरच नमुना पिशव्यांसह (Sample Bags) आणखी एक प्रेझेंटेशन आयोजित केले जाणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांना नियमानुसार योग्य पिशव्या निवडणे सोपे होणार आहे.
कमी दर्जाच्या कॅरीबॅगवर तात्काळ बंदी
मुख्याधिकारी गारवे यांनी यावेळी स्पष्ट केले की, सध्या बाजारात दिसणाऱ्या हलक्या आणि कमी दर्जाच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर कडक बंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी अशा निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचा वापर थांबवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यापाऱ्यांचा सहकार्याचा हात
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही नगरपालिकेला पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. प्रशासनाच्या या धडाकेबाज पावलामुळे रत्नागिरी शहर लवकरच प्लास्टिक मुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.











