खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा समजल्या जाणाऱ्या जगबुडी पुलावर रविवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक वेगवान मालवाहू कंटेनर पुलाचे दुभाजक तोडून दोन पुलांच्या मधोमध असलेल्या रिकाम्या जागेत अडकला. सुदैवाने, हा कंटेनर पुलाच्या संरचनेत अडकल्याने २०० फूट खोल नदीपात्रात कोसळण्यापासून थोडक्यात बचावला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला. खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरातील जगबुडी नदीवर जुना आणि नवीन असे दोन पूल आहेत. गोव्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर पुलावर आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हा कंटेनर वेगाने पुलाचे दुभाजक तोडून दोन्ही पुलांच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन अडकला. कंटेनरचा अर्धा भाग थेट नदीच्या दिशेने हवेत झुकल्याने पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
दोन मोठ्या क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य
घटनेचे गांभीर्य ओळखून महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर अशा स्थितीत होता की तो कोणत्याही क्षणी खाली नदीत कोसळण्याची भीती होती. तातडीने दोन मोठ्या क्रेन पाचारण करण्यात आल्या आणि युद्धपातळीवर बचावकार्य राबवून हा कंटेनर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, चालक किरकोळ जखमी झाला आहे.
वाहतुकीचा खोळंबा आणि प्रवाशांची चिंता
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कंटेनर बाहेर काढण्यासाठी पोलिसांना एक मार्गिका सुमारे दीड तास बंद ठेवावी लागली. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेआठच्या सुमारास कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक संथ गतीने पूर्ववत झाली.
आठवडाभरातील दुसरी घटना
विशेष म्हणजे, जगबुडी पुलावर आठवडाभरात घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावरील या ‘ब्लॅक स्पॉट’वर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 13-04-2026












