गावखडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय बालकाचा समुद्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी: सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये वडिलांनी आपल्या दोन मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने आपल्या १३ वर्षांच्या मुलाला, श्रेयश सागर गोसावी, याला वाचवण्यात त्यांना अपयश आले.

नेमकी घटना काय?

मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील असलेले सागर मोहन गोसावी हे सध्या रत्नागिरीतील मेर्वी येथे भंगार व्यवसाय करतात. शुक्रवारी (ता. १०) शाळा सकाळची असल्याने मुलगा श्रेयश दुपारी घरी आला होता. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास सागर गोसावी हे श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील सुरूच्या बनात फिरण्यासाठी गेले होते.

दुपारी दोनच्या सुमारास मुले समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांमध्ये खेळत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकला आणि लाटांनी मुलांना ओढण्यास सुरुवात केली. मुले पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहून सागर गोसावी यांनी क्षणाचाही विचार न करता समुद्रात उडी घेतली.

वडिलांची जीवाची बाजी, पण…

सागर गोसावी यांनी आपल्या जिवाची बाजी लावत मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर ते तातडीने श्रेयशला वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात शिरले, परंतु तोपर्यंत श्रेयश लाटांसोबत खोल पाण्यात ओढला गेला आणि बेपत्ता झाला. एका बापाने डोळ्यादेखत आपल्या पोटच्या गोळ्याला लाटांनी हिरावून नेताना पाहिले, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tata nexon

शोधमोहीम आणि मृतदेह सापडला

घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलीस, स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. बोटीच्या साहाय्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र अंधारामुळे शोध घेण्यास अडथळे आले. अखेर शनिवारी (ता. ११) सकाळी ८ वाजेच्या सुमारास श्रेयशचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावरील सुरूच्या बनाजवळ तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठवला.


शाळेत शोककळा आणि अंत्यसंस्कार

श्रेयश हा पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर येथे सहावीत शिकत होता. एक हुशार आणि खेळकर विद्यार्थी गमावल्याने शाळेवर शोककळा पसरली आहे. शाळेत त्याला श्रद्धांजली अर्पण करून शाळा बंद ठेवण्यात आली. श्रेयशचे पार्थिव त्याच्या मूळ गावी तांदूळवाडी (जि. सांगली) येथे नेण्यात आले असून, तिथेच त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्त्वाची सूचना: पावसाळा आणि भरती-ओहोटीच्या काळात समुद्रकिनारी जाताना पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी. समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्यास अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 13-04-2026