रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या भाजप-शिवसेना महायुतीच्या महिला नगरसेविकांनी नुकताच बारामती येथे महत्वपूर्ण अभ्यास दौरा केला. या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक विशेष सदिच्छा भेट पार पडली. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई पवार यांची भेट घेण्यात आली. या भेटीत रत्नागिरी शहराचा विकास आणि महिला सक्षमीकरणावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
विकासाच्या मुद्द्यांवर थेट चर्चा
या सदिच्छा भेटीदरम्यान रत्नागिरी शहरातील विविध प्रलंबित विकासकामे, महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक प्रश्नांबाबत सविस्तर मांडणी करण्यात आली. नगरसेविकांनी आपल्या प्रभागातील अडचणी आणि विकासाच्या गरजा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासमोर मांडल्या. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाचे सहकार्य मिळावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
‘नारीशक्ती वंदन’ अभियानावर विशेष भर
या भेटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या ‘नारीशक्ती वंदन’ अभियानांतर्गत महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यावर दिलेला भर. नारीशक्ती वंदन कायद्यामुळे महिलांना मिळालेले राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधींचे वाढलेले महत्त्व यावर सुनेत्राताई पवार यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीतील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शासनाच्या लोकोपयोगी योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाचा विचार केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नगरसेविकांची लक्षणीय उपस्थिती
चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. वर्षाताई ढेकणे यांच्या संयोजनातून ही भेट यशस्वी झाली. यावेळी रत्नागिरीतील महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये:
- सौ. वर्षा ढेकणे (जिल्हाध्यक्षा, महिला मोर्चा)
- सौ. स्मितल पावसकर
- सौ. प्रीती सुर्वे
- सौ. सुप्रिया रसाळ
- सौ. मानसी करमरकर
- सौ. सायली पाटील
- सौ. श्रद्धा हळदणकर
- सौ. वैभवी खेडेकर
- सौ. आफरीन होडेकर
- सौ. मेधा कुलकर्णी
- सौ. पुजा पवार
- सौ. जागृती पिलणकर
- सौ. निवेदिता कळंबटे
- रुक्सार खान, नाहिदा सोलकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विकासाला नवी गती मिळणार
“शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास उपस्थित नगरसेविकांनी यावेळी व्यक्त केला. ही भेट रत्नागिरी शहराच्या भविष्यातील विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असून, अशा समन्वयातून विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.











