रत्नागिरी: “रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचा दर्जा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय सुधारला आहे. गुढघारोपण सारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता येथे यशस्वी होत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयाकडे प्रसूतीसाठी (डिलीव्हरी) रुग्ण पाठवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्यासाठी भरारी पथके तैनात करा,” असे स्पष्ट निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेत आगामी प्रकल्पांबाबत चर्चा केली.
वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठा आधार: १४५ डॉक्टरांची फळी सज्ज
पालकमंत्री म्हणाले की, रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याचा मोठा फायदा जिल्हा रुग्णालयाला झाला आहे. सध्या रुग्णालयात १४५ डॉक्टर्स कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थीही जिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत, ज्यामुळे आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे.
रुग्णवाहिकांचा नवा प्रस्ताव: रुग्णांच्या सोयीसाठी २ कार्डियाक (हृदयरोग विभाग सज्ज) आणि १२ सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
दिव्यांगांच्या पेन्शनसाठी विशेष शिबिराचे आयोजन
ऑडिओलॉजिस्ट (कर्णबधिरता तज्ज्ञ) उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिव्यांगांची पेन्शन रखडली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले:
- सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथून ऑडिओलॉजिस्ट बोलावून तातडीने तपासणी शिबिरे घ्यावीत.
- दिव्यांगांच्या प्रमाणपत्रातील टक्केवारीमध्ये झालेल्या तफावतीची (काही ठिकाणी वाढलेली तर काही ठिकाणी कमी झालेली टक्केवारी) चौकशी केली जाईल.
- जुन्या आणि नवीन प्रमाणपत्रांची फेरतपासणी करून पात्र दिव्यांगांची पेन्शन त्वरित सुरू करण्यात येईल.
समिती सदस्यांना कानपिचक्या: ‘महिन्यातून एकदा बैठक घ्या’
रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीच्या सदस्यांनी सक्रिय होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
- समिती सदस्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवाव्यात.
- ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहतात का, यावर देखरेख ठेवावी.
- महिन्यातून किमान एकदा तरी आढावा बैठक घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला उपस्थित मान्यवर
या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, तसेच समिती सदस्य हर्षदा गावडे, श्रद्धा मोरे, अभिजीत दुडे, सुहेल मुकादम, बंड्या साळवी, सागर भिंगारे आणि संपदा तळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)@
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 17-04-2026














