रत्नागिरी: कोकणची जीवनवाहिनी असलेल्या आंबा आणि काजू उत्पादनावर सध्या मोठे संकट ओढवले आहे. निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या तुटपुंज्या मदतीमुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांनी आता आर-पारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील आंबा आणि काजू उत्पादकांचा ‘एल्गार मेळावा’ शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. हेक्टरी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
काय आहे शेतकऱ्यांची प्रमुख मागणी?
गेल्या काही वर्षांपासून कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अत्यंत अल्प असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे, ‘हेक्टरी ५ लाख रुपयांची भरपाई मिळावी’, या मागणीसाठी हा एल्गार मेळावा पुकारण्यात आला आहे.
मेळाव्याची माहिती:
- दिनांक: शनिवार
- वेळ: सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत
- स्थळ: बालाजी मंगल कार्यालय, नाचणे, रत्नागिरी.
- प्रमुख मार्गदर्शक: शेतकरी नेते राजू शेट्टी
- प्रमुख उपस्थिती: माजी खासदार विनायक राऊत
५० वर्षांतील निच्चांकी उत्पादनाचा काळ
माजी आमदार बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात आंबा उत्पादक शेतकरी इतका हवालदिल कधीच झाला नव्हता. कोकणात सुमारे १.५ कोटी आंबा आणि ३ कोटी काजूची झाडे आहेत, तरीही लागवड थंडावली आहे. निकृष्ट दर्जाची खते, औषधे आणि अनियमित पावसामुळे यंदा हातात केवळ २० टक्केच उत्पादन आले आहे.”
‘राजकीय जोडे बाहेर ठेवा’ – बाळ माने यांचे आवाहन
हे आंदोलन कोणत्याही एका सरकार किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून, ते केवळ कोकणातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आहे, असे बाळ माने यांनी स्पष्ट केले आहे. “सर्व राजकीय पक्षांनी आपापले झेंडे आणि राजकीय जोडे बाहेर ठेवून, केवळ शेतकरी बांधव म्हणून या लढाईत एकत्र यावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळ माने यांच्यासोबत कोकण हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश (बावा) साळवी, उबाठा शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सावंत, विभागप्रमुख मयुरेश पाटील आणि विजय देसाई उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आवाहान
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी बांधव, तसेच मच्छीमार बांधवांना या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मेळाव्यातूनच आंबा आणि काजू उत्पादकांच्या पुढील लढ्याची दिशा ठरणार असल्याने, या सभेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 18-04-2026














