१५ मे नंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडकणार; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

रत्नागिरी: कोकणातील हापूस आणि काजू बागायतदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारविरोधात आता रान पेटले आहे. रत्नागिरीतील बालाजी हॉल येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी सरकारकडे कोट्यवधींचा निधी आहे, मात्र कोकणच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला २२० रुपयांचे पान पुसले जात आहे,” असे म्हणत शेट्टी यांनी १५ मे नंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालणार!

सरकारच्या ढिम्म धोरणांचा निषेध करताना राजू शेट्टी म्हणाले की, “आता ही लढाई थांबणार नाही. १५ मे नंतर आम्ही मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात जेवायला घुसणार आहोत.” सरकारचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती संकुचित आहे, हे सांगताना त्यांनी राज्यातील ९ लाख कोटींच्या कर्जाचा आणि शक्तीपीठासारख्या प्रकल्पांवर उधळल्या जाणाऱ्या १ लाख कोटींचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, ही मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.

स्थानिक नेत्यांवरही साधले निशाणे

कोकणातील स्थानिक नेत्यांच्या निष्क्रियतेवरही शेट्टी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “२२० रुपयांच्या तुटपुंज्या मदतीबद्दल कोकणातील एकाही नेत्याला राग कसा आला नाही?” असा सवाल त्यांनी केला. या नेत्यांना खडेबोल सुनावताना ते म्हणाले की, “या नेत्यांना कलमाला उलटे टांगले तरी त्यांच्या खिशातून दोन हजार रुपयांच्या नोटा पडतील, मग शेतकऱ्यांना मदत करताना का लाज वाटते?” तसेच, ‘बटेंगे-कटेंगे’ सारख्या भावनिक मुद्द्यांवर जनतेला जास्त काळ फसवता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

व्यापाऱ्यांसाठी कडक ताकीद

आंबा बागायतदारांची लूट थांबवण्यासाठी राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्यांना थेट धमकी दिली आहे:

  • व्याज आकारणीवर बंदी: जर व्यापाऱ्यांनी बागायतदारांनी घेतलेल्या ॲडव्हान्सवर बेकायदेशीर व्याज आकारले, तर त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला.
  • पेढ्या उध्वस्त करण्याचा इशारा: बाजारसमितीत आंब्याचे दर बदलणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पेढ्या उध्वस्त केल्या जातील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

शेतकऱ्यांच्या व्यथा आणि नेत्यांचे समर्थन

या मेळाव्यात माजी खासदार विनायक राऊत आणि शेतकरी नेते बावा साळवी यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली.

  • बावा साळवी: “शेतकरी आता धमक्यांना घाबरणार नाही. मुंबईत जेव्हा आम्ही धडक देऊ, तेव्हा येथून हजारो शेतकऱ्यांचा जनसागर उसळेल.”
  • विनायक राऊत: “कोकणची जमीन दिल्लीवाल्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. आंबा-काजू बोर्डाची मागणी दुर्लक्षित केली जात आहे. भविष्यातील पिढीला वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरावेच लागेल.”

या मेळाव्याला बाळ माने, राजेंद्र कदम, काका मोटे, गणेश गावकर, दत्ता कदम आणि चंद्रकांत शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा-काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्यामुळे आता कोकणातील शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 20-04-2026