रत्नागिरी: संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक ‘महिला आरक्षण विधेयक’ विरोधी पक्षांच्या, विशेषतः काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे फेटाळले गेल्याचा आरोप करत रत्नागिरी शहर शिवसेनेतर्फे (शिंदे गट) जोरदार निदर्शने करण्यात आली. रत्नागिरीतील ऐतिहासिक जयस्तंभ चौकात शनिवारी शिवसेनेच्या महिला आघाडीने एकत्र जमत विरोधकांचा तीव्र निषेध केला आणि आरक्षणाच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारला.
विरोधकांचे ‘स्त्रीविरोधी’ चेहरे उघडे पडले: नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे
या आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर बोचरी टीका केली. “विरोधी पक्षांना स्त्रियांच्या प्रगतीची भीती वाटते. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याऐवजी राजकारण आडवे आणून महिलांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम विरोधकांनी केले आहे. त्यांचे हे ‘स्त्रीविरोधी’ चेहरे आता जनतेसमोर उघडे पडले आहेत,” अशा शब्दांत शिल्पा सुर्वे यांनी आपला संताप व्यक्त केला.
राजकीय वैमनस्यातून विधेयकाला विरोध
हे विधेयक महिलांना कायदेशीर अधिकार देणारे असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत गरजेचे होते. तरीही, केवळ राजकीय वैमनस्य आणि द्वेषापोटी विरोधकांनी हे विधेयक पाडल्याचा गंभीर आरोप आंदोलक महिलांनी केला. जयस्तंभ परिसर रणरागिणींच्या घोषणांनी दणाणून सोडत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विरोधकांचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते.
मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग
या आंदोलनात नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्यासह नगरसेविका पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, प्रीती सुर्वे आणि जागृती पिलणकर या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या शेकडो महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शेवटी जोरदार घोषणाबाजी करत या निषेध सभेची सांगता करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:57 20-04-2026














