सुवर्णयोग
पी. जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर. बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, याच महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी, विद्यमान शिक्षक आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा सहकार्यवाह या नात्याने, महाविद्यालयाला माझ्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा!
फाटक हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण झाल्यावर, १९९१ साली अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा विद्यार्थी म्हणून मी पाऊल ठेवल तो दिवस आजही तसाच आठवतो. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज संस्थेचा सहकार्यवाह या पदापर्यंत पोहोचला आहे; हा माझ्या आयुष्यातील एक विलक्षण ‘सुवर्णयोग’ आहे असे मी मानतो.
आज मागे वळून पाहताना कनिष्ठ महाविद्यालयाची ती दोन वर्ष डोळ्यासमोर लख्ख उभे राहतात. महाविद्यालयाचा तो कट्टा, मधल्या सुट्टीत मित्रांसोबत रंगलेल्या गप्पा, महाविद्यालयाचे कॅन्टीन, वाचनालय आणि वर्गातील ते भारलेले वातावरण, क्रीडास्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत महाविद्यालयाचे केलेले प्रतिनिधित्व आजही आठवते. केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर आयुष्याचे धडेही याच वर्गांमध्ये मिळाले. कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम करायची संधी मिळाली आणि कोणतंही पद मिळालं तरी कार्यकर्ता या भावनेने त्या पदाला न्याय देण्याचे परिषदेचे संस्कार ही याच महाविद्यालात रुजले.
तेव्हाचे आमचे शिक्षक आणि प्राध्यापक यांचे केवळ शिकवणेच नव्हे, तर त्यांचे व्यक्तिमत्वही आम्हाला प्रेरणादायी ठरायचे. ज्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाले त्याच महाविद्यालयात शिक्षक म्हणून रुजू होण्यात विशेष आनंद होता. एकाच महाविद्यालयात आधी विद्यार्थी म्हणून वावरणे आणि नंतर त्याच ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होणे, हा अनुभव अत्यंत भावूक आणि विलक्षण असतो. हा प्रवास केवळ एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत केलेला बदल नसून, तो एका पूर्ण वर्तुळाचा प्रवास आहे. १९९७ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या एम.सी.व्ही.सी. (MCVC) विभागात अध्यापक म्हणून रुजू झालो. हा विभाग कौशल्य विकासावर आधारित असल्याने, विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून न देता त्यांना जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्यात मला विशेष आनंद मिळतो आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही B.Com. , B.M.S., Accounting and Finance या विविध अभ्यास क्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १३ वर्षे अध्यापन करण्याची संधी मला मिळाली. विद्यार्थ्यांना शिकवताना मी स्वतःही समृद्ध होत गेलो. अध्यापन कार्य सुरू असतानाच, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेट कीर विधी महाविद्यालयामुळे मला कायद्याचे शिक्षण घेण्याची प्रेरणा व संधी मिळाली. सन २०११ मध्ये मी ‘लॉ ऑफ क्राईम्स’ विषयात मुंबई विद्यापीठाच्या मेडलसह एल.एल.बी. (LL.B.) पूर्ण केले आणि काळाची गरज ओळखून ‘सायबर लॉ’मधील डिप्लोमादेखील यशस्वीपणे पूर्ण केला.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने माझ्यावर विश्वास टाकून मला आजीव सभासदत्व दिले. विश्वस्त मंडळाचा सचिव, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए. अभ्यासक्रमाचा समन्वयक, विद्यार्थी वसतिगृहाचा रेक्टर, आजीव सभासद मंडळाचा सचिव आणि आज संस्थेचा सहकार्यवाह अशा विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडताना मला नेहमीच समाधान वाटते. ही संस्था म्हणजे माझे केवळ कार्यक्षेत्र नसून माझे दुसरे घर आहे. तसेच हे महाविद्यालय माझ्यासाठी फक्त एक वास्तू नाही, तर ती माझ्या आयुष्याची जडणघडण करणारी शाळा आहे. विद्यार्थी म्हणून याने मला स्वप्न पाहायला शिकवलं आणि शिक्षक म्हणून ती स्वप्नं प्रत्यक्ष जगण्याची संधी दिली. हा प्रवास एकाच नाण्याच्या दोन बाजू अनुभवण्यासारखा आहे. मला या महाविद्यालयाने सर्व काही दिले, ज्ञान, संस्कार, मित्र आणि ओळख. आता शिक्षक म्हणून ते सर्व माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे.
मला घडवणाऱ्या, माझ्यावर संस्कार करणाऱ्या आणि मला सर्वार्थाने समृद्ध करणाऱ्या या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल अशीच अविरत आणि देदीप्यमान सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!
–श्री. श्रीकांत र. दुदगीकर
सहकार्यवाह, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:23 02-05-2026














