राजापूर हायस्कूलच्या स्वच्छतागृहासाठी पालक-शिक्षक संघाकडून दोन लाखांची देणगी

रत्नागिरी : पालक-शिक्षक संघाने दिलल्या दोन लाख रुपयांच्या देणगीतून राजापूर हायस्कूलमधील विविध सोयीसुविधांनी युक्त स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे कार्यवाह जगदीश पवार यांच्याकडे देणगीच्या रकमेचा धनादेश शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुघोष काळे, प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश भालशंकर, पालक प्रतिनिधी, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी आदींनी सुपूर्द केला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वंकष चर्चा करून निर्णय घेता यावा यादृष्टीने राजापूर हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली आहे. या शिक्षक-पालक संघाच्या गत महिन्यामध्ये झालेल्या सभेमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाच्या समस्येवर चर्चा केली होती. या चर्चेवेळी सर्व सोयीसुविधांनी युक्त स्वच्छतागृह असावे अशी मागणी केली होती. मुलांसह पालकांची मागणी लक्षात घेऊन संस्थेकडून स्वच्छतागृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला प्रतिसाद देत शिक्षक-पालक संघाने दोन लाख रुपयांची मदत दिली.

शाळेतील सुविधांसाठी पालक-शिक्षक संघाने मदत करून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. प्राप्त निधीतून सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात येईल कार्यवाह जगदीश पवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 04/Nov/2024