रत्नागिरी : सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात महायुतीकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मविआकडून उबाठाचे बाळ माने, बसपाचे भारत पवार यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. यात शिवसेना उबाठाचे बंडखोर उमेदवार उदय बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उदय सामंत आणि बाळ माने यांनी जादाचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आठ उमेदवार आहेत.
विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले. महायुतीकडून शिवसेनेचे उदय सामंत यांना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. महाविकास आघाडीकडून उबाठाचे बाळ माने यांना मशाल चिन्ह मिळाले आहे. भारत पवार यांना बसपाचे हत्ती हे चिन्ह मिळाले आहे.
या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 5 अपक्ष उमेदवार असून, यात कैस नूरमहमंद फणसोपकर यांना वाळूचे घड्याळ हे चिन्ह मिळाले आहे. कोमल किशोर तोडणकर यांना कॉम्प्युटर, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील यांना माचिस ही निशाणी मिळाली आहे. दिलीप काशीनाथ यादव यांना इस्त्री तर पंकज प्रताप तोडणकर यांना बॅट ही निशाणी मिळाली आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 91 हजार 221 मतदार असून, त्यात 1 लाख 42 हजार 048 पुरुष तर 1 लाख 49 हजार 162 महिला आणि 11 तृतीयपंथी मतदार आहेत. यात 85 वर्षाहून अधिकचे 3,661 मतदार आहेत. 1213 दिव्यांग मतदार आहेत. मतदार संघात 352 मतदान केंद्र असून शहरात 71 तर ग्रामीण भागात 281 मतदान केंद्र आहेत. – जीवन देसाई,निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी विधानसभा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 05-11-2024