मान्सून सक्रिय! कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई: पावसाने अतिशय जोरदार पुनरागमन केले आहे. रविवारी रात्री ११ ते पहाटे २ च्या सुमारास मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली, तर सोमवारी दिवसभरही मुंबईत ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच होती. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसाचा हा मुक्काम आणखी आठवडाभर कायम राहणार असून मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बुधवार आणि गुरुवार पाऊस किंचित विश्रांती घेणार असून अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या नवीन प्रवाहामुळे या हंगामातील सर्वात मोठा पाऊस कोकणात अपेक्षित असून यंत्रणांना सतर्क राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

कोकणात ३५० ते ५०० मिमी पावसाचा अंदाज

३० जून ते ३ जुलै दरम्यान गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात येथे तब्बल ३५० ते ५०० मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो. दुसरीकडे मुंबई, पालघर आणि आसपासच्या परिसरात एकूण ३५० ते ६०० मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात किनारपट्टीवर जास्त पाऊस होईल, तर आठवड्याच्या मध्यापासून कल्याण-डोंबिवली आणि शहापूर या अंतर्गत भागात पावसाचा जोर अधिक वाढेल.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाची स्थिती

मध्य महाराष्ट्र, पुणे आणि मराठवाडा या भागात आठवडाभरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून ५० ते १५० मिमी पावसाची नोंद होऊ शकते. विदर्भातही वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

ठाण्यात २४ तासांत पावसाची शंभरी

ठाणे शहरात रविवार रात्री ११:३० ते पहाटे ३:३० या अवघ्या चार तासांच्या कालावधीत पावसाने शंभरी गाठली. सोमवारी सकाळपासून अधूनमधून रिपरिप सुरूच होती. या मुसळधार पावसामुळे रात्री शहरातील सहा वेगवेगळ्या सखल ठिकाणी पाणी साचले होते. यंदाच्या आकडेवारीचा विचार केला तर मागील वर्षी या कालावधीत ७९७.९३ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५६९.४२ मिमी कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरांतही रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली.

नवी मुंबई आणि पनवेल परिसराला झोडपले

नवी मुंबई आणि पनवेल परिसराला रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत नवी मुंबईत ११८ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सायन-पनवेल हायवे आणि मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) आवारातही पाणी साचले होते. तसेच पनवेल परिसरातील पळस्पेफाटा आणि गोवा महामार्गावरील शिरढोण येथे मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री पाणी साचले होते. रात्री धुवांधार बरसलेल्या या पावसाने दिवसा मात्र दडी मारली.

रायगड जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतकरी सुखावला

रायगड जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा वेग घेतला असून सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७३.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये पनवेल, माणगाव, तळा, पोलादपूर आणि म्हसळा या तालुक्यांत पावसाचा विशेष जोर पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा सुरुवात केल्यामुळे शेतात टाकलेले राब वाया जाण्याच्या चिंतेत शेतकरी सापडला होता. मात्र, अखेर या जोरदार आगमनाने शेतकरी सुखावला आहे. सतत पडत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:48 30-06-2026