लवकरच अर्थखाते राष्ट्रवादीकडे येईल : जय पवार

बारामती (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी बारामतीच्या विकासाबाबत आणि राजकीय घडामोडींवर अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. अर्थखाते आपल्याकडे नसल्यामुळे विकासकामे थांबल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात तसे काहीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘अजितदादा’ आपल्याला सोडून गेल्यावर, त्यावेळी अर्थसंकल्प जवळ असल्यामुळे ‘सीएम’ साहेबांनी ते खाते स्वतःकडे ठेवले होते. मात्र, नुकतीच पार्थदादा, सुनेत्रावहिनी आणि आमची याबाबत चर्चा झाली असून, लवकरच अर्थखाते आपल्याकडे येईल, तसेच ‘दादां’ची विकासकामांची स्वप्ने पूर्ण होतील, असा विश्वास ‘सीएम’ साहेबांनी दिल्याचा खुलासा जय पवार यांनी केला आहे.

बारामती पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या कृतज्ञता मेळाव्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

बारामती विमानतळाचे आधुनिकीकरण आणि दोन परदेशी कंपन्या

जय पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, अजितदादांसारखेच गतीने काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातच ‘दादां’समवेत बारामती विमानतळाच्या सुरक्षेबाबत आणि विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. अनेक व्हीआयपी या विमानतळावर येत असल्यामुळे, निवडणूक झाल्यावर हे विमानतळ अधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्याचे दादांच्या मनात होते. त्यानुसार ‘दादां’नी हे विमानतळ ‘एमआयडीसी’च्या ताब्यात देखील घेतले होते. बारामतीचा विकास कधीही थांबता कामा नये, हेच दादांचे स्वप्न होते आणि माझेदेखील तेच स्वप्न आहे. याच पार्श्वभूमीवर, नुकतीच काही अधिकाऱ्यांसह दुबई येथील तज्ज्ञांसमवेत बारामती विमानतळाची पाहणी करण्यात आली आहे. तसेच बारामतीत लवकरच दोन परदेशी कंपन्या आणून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासाठी सध्या बोलणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ट्रोलर्सना सडेतोड उत्तर आणि कुटुंबाची शिकवण

रेवती सुळे यांच्या विवाहात केलेल्या ‘डान्स स्टेप’वरून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगचा जय पवार यांनी समाचार घेतला. राजकारण बाजूला आणि कुटुंब वेगळे, हीच ‘दादां’ची आम्हाला शिकवण आहे, असे सांगत ते म्हणाले की, दोन डान्स स्टेपवरून कमेंट्समध्ये काही जण चुकीचे बोलले. पण अशा कमेंट्सने मला काहीही फरक पडत नाही. मला माझ्या जनतेची काळजी सर्वात महत्त्वाची वाटते, असे उत्तर त्यांनी ट्रोलर्सना दिले.

२८ तारखेला जीवन बदलले; बारामतीतच उभारणार ‘दादां’चे स्मारक

गतवर्षातील आठवणींना उजाळा देत जय पवार म्हणाले की, २६ जानेवारीला ‘दादां’ची भेट झाली होती, तेव्हा त्यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत पुढील ३ वर्षे शांततेत काम करून सुट्टीवर जाण्याचे संकेत दिले होते. मात्र, २८ तारखेला अचानक आपल्या सर्वांचे जीवन बदलले. विशेषतः माझे, पार्थदादा आणि वहिनींचे जीवन खूप वेगाने बदलले आणि आमच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या. सर्वांनाच आधाराची गरज वाटत असल्यामुळे आम्ही बारामती आणि राज्यातील जनतेसाठी झटण्याचा खंबीर निर्णय घेतला.

अजित पवार यांचे स्मारक पुणे किंवा मुंबईत करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. मात्र, कुटुंबीय आणि निकटवर्तीयांसमवेत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर, ‘दादां’चे भव्य स्मारक बारामतीतच उभारण्याचा अंतिम निर्णय आम्ही घेतला असल्याचे जय पवार यांनी जाहीर केले. या मेळाव्याला बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, गटनेते बाबा चोरमले, उपगटनेते नितीन काकडे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:48 30-06-2026