Aviraj Gawde Rohit Sharma : रत्नागिरीच्या अविराज गावडेची इंग्लंडमध्ये गरुडझेप; नेट प्रॅक्टिसमध्ये थेट रोहित शर्माला केलं बोल्ड, हिटमॅनकडून मराठीत कानमंत्र!

“अरे वा, आपल्याकडचाच आहेस!” महाराष्ट्राचा समजताच रोहित शर्माने केला मराठीत संवाद; रत्नागिरीच्या अष्टपैलू लेगस्पिनरचे कौतुक

Aviraj Gawde Rohit Sharma : क्रिकेटपटू म्हणून मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूला भारतीय संघाचा महान फलंदाज रोहित शर्मा प्रत्यक्ष भेटावा, त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळावी आणि त्याच्याकडून थेट आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून मार्गदर्शन मिळावे, हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. पण हा सगळा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू असलेला अष्टपैलू खेळाडू अविराज अनिल गावडे याने प्रत्यक्षात अनुभवला आहे.

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना अविराजला रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्यात झालेला संवाद या रत्नागिरीच्या तरुणासाठी आयुष्यभराची मोठी प्रेरणा ठरला आहे.

‘एनसीए’च्या टी-शर्टमुळे चमकले नशीब!

अविराज गावडे सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला असून आपल्या दमदार कामगिरीमुळे त्याने अनेक सामन्यांत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही पटकावले आहेत. त्याच काळात भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी सरावासाठी रोहित शर्मा मिडलसेक्स काऊंटीच्या मैदानावर येणार असल्याची माहिती अविराजला मिळाली. तो आपल्या मित्रासह रोहितला पाहण्यासाठी मैदानावर गेला होता. अविराजने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) टी-शर्ट घातल्यामुळे तेथील विंबल्डन क्लबचे चेअरमन सोहम यांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

त्यांनी अविराजची चौकशी केली. आपण लेगस्पिन गोलंदाज असल्याचे सांगत काऊंटीमधील कामगिरीची माहिती दिल्यानंतर चेअरमन सोहम यांनी अचानक एक प्रश्न विचारला, “रोहित शर्माला गोलंदाजी करशील का?” हा प्रश्न ऐकून अविराज क्षणभर अवाकच झाला.

१५ मिनिटांत किट आणले आणि रोहितला केले ‘बोल्ड’!

सरावाचे साहित्य घरी असल्याचे सांगताच आयोजकांनी त्याला ते १५ मिनिटांत आणण्यास सांगितले. अविराजने मित्राच्या मदतीने तातडीने घरून किट आणले आणि तो मैदानावर हजर झाला. थोड्याच वेळात रोहित शर्मा मैदानात दाखल झाला. सुरुवातीला प्रचंड दडपणाखाली असलेल्या अविराजला स्वतः रोहितनेच धीर दिला आणि म्हणाला, “दडपण घेऊ नकोस, तुझा नैसर्गिक खेळ खेळ”.

त्यानंतर अविराजने रोहितला सलग ५ षटके लेगस्पिन गोलंदाजी केली. या सराव सत्रादरम्यान एका अप्रतिम चेंडूवर अविराजने चक्क महान फलंदाज रोहित शर्माला त्रिफळाचीत (Clean Bold) केले! त्यावर हसत रोहित म्हणाला, “आता कितीही चांगली गोलंदाजी केलीस तरी मी पुन्हा बाद होणार नाही”. त्याप्रमाणे उर्वरित सरावात रोहित बाद झाला नाही, मात्र त्याने अविराजच्या गोलंदाजीचे मनापासून कौतुक केले.

इंग्रजीत सुरू झालेली चर्चा थेट मराठीत!

सराव संपल्यानंतर रोहितने अविराजशी संवाद साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला इंग्रजीत सुरू झालेली ही चर्चा जेव्हा अविराज महाराष्ट्रातील असल्याचे रोहितला समजले, तेव्हा थेट मराठीत सुरू झाली. “अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच आहेस!” असे म्हणत रोहितने अगदी आपुलकीने चौकशी केली.

या प्रसंगी रोहित शर्माने युवा क्रिकेटपटूंना यशस्वी होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा गुरुमंत्र दिला:

  • “फक्त चांगली लाइन-लेंथ टाकणे पुरेसे नाही. गोलंदाज असशील तर विकेट्स घ्यायच्या आणि फलंदाज असशील तर भरपूर धावा करायच्या.”
  • “भारतात लाखो क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळे आणि उठून दिसण्यासाठी तुमची मैदानातील कामगिरीच बोलली पाहिजे, मेहनतीला कोणताही पर्याय नाही.”
  • “तुझ्या मनगटात नैसर्गिक कौशल्य (Natural Talent) आहे, आता फक्त जास्तीत जास्त विकेट्स आणि धावा करण्यावर लक्ष केंद्रित कर.”

वडिलांशी फोन लागला नाही, पण रोहितच्या साधेपणाने जिंकले मन

इंग्लंडमध्ये चार महिने राहून मेहनत घेण्याच्या अविराजच्या निर्णयाचेही रोहितने कौतुक केले आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला. संवादाच्या शेवटी अविराजने रोहितला आपल्या वडिलांशी फोनवर बोलण्याची विनंती केली. रोहितने अत्यंत आनंदाने होकार दिला, मात्र दोनदा प्रयत्न करूनही अविराजचे वडील अनिल गावडे यांना नेटवर्कअभावी फोन लागला नाही. त्यावरही अत्यंत नम्रपणे रोहित हसत म्हणाला, “काही हरकत नाही, पुढच्या वेळी नक्की बोलू”.

अविराज गावडेची भावनिक प्रतिक्रिया: “एवढा मोठा जागतिक कीर्तीचा क्रिकेटपटू असूनही रोहित भाईची साधी राहणी, नम्र स्वभाव आणि युवा खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन पाहून मी पूर्णपणे भारावून गेलो. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोलाचा क्षण आहे, त्या रात्री मला आनंदाने झोपच आली नाही. रोहित शर्मासारख्या महान खेळाड्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून दिलेला हा मराठीतील सल्ला मी आयुष्यभर विसरणार नाही.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:54 11-07-2026