अमृत 2.0 अभियानांतर्गत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १२ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, केंद्र-राज्य सरकारकडून तब्बल ९५ टक्के निधी
लांजा : Lanja Water Supply Project अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, लांजा नगरपंचायतीच्या ६५.७७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत नगर विकास विभागाने १४ जुलै २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला असून, या प्रकल्पाची अंमलबजावणी लांजा नगरपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे.
Lanja Water Supply Project ला शासनाची अधिकृत मंजुरी
शासन निर्णयानुसार, लांजा नगरपंचायतीचा पाणीपुरवठा प्रकल्प राज्याच्या अमृत 2.0 अभियानातील मंजूर जलकृती आराखड्याचा भाग आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाणे विभागाने या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता दिल्यानंतर राज्यस्तरीय तांत्रिक समितीने ३ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून ६२.४८ कोटींचा निधी
या प्रकल्पासाठी एकूण ६५.७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यामध्ये,
केंद्र शासनाचा हिस्सा – ३२.८८ कोटी रुपये (५०%)
राज्य शासनाचा हिस्सा – २९.६० कोटी रुपये (४५%)
लांजा नगरपंचायतीचा हिस्सा – ३.२९ कोटी रुपये (५%)
असा निधीचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे.
आधुनिक पाणीपुरवठा व्यवस्था उभारणार
प्रकल्पांतर्गत लांजा शहरासाठी आधुनिक जलपुरवठा व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पन्हाळे धरण आणि बेनी नदी येथून कच्च्या पाण्याचे उपसा केंद्र, नवीन जॅकवेल, पंपगृह, कच्च्या पाण्याची वाहिनी, ९ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, विविध जलसाठे, उंच जलकुंभ, वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प, रस्त्यांची पुनर्बांधणी तसेच आवश्यक पूरक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
८६ किलोमीटरहून अधिक वितरण जाळे
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुमारे ८६.३७ किलोमीटर लांबीची नवीन पाणी वितरण वाहिनी उभारण्यात येणार आहे. याशिवाय सात नवीन उंच व जमिनीवरील जलसाठे, फीडर मेन, विविध झोनसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था आणि २४५ केडब्ल्यूपी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचाही समावेश आहे.
१२ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
शासनाने या प्रकल्पाचा कालावधी १२ महिने निश्चित केला आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर ४५ दिवसांच्या आत कामाचे आदेश देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. प्रकल्पाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानातील मार्गदर्शक सूचनांनुसार करावी लागणार असून गुणवत्ता, निधीचा वापर आणि वेळेत काम पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट अटी घालण्यात आल्या आहेत.
लांजा शहराच्या पाणीपुरवठ्याला मिळणार दीर्घकालीन बळ
या प्रकल्पामुळे लांजा शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास मदत होणार आहे. आधुनिक जलशुद्धीकरण, साठवण आणि वितरण व्यवस्थेमुळे पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि शाश्वत करण्याचा शासनाचा उद्देश असून, अमृत 2.0 अभियानांतर्गत लांजा नगरपंचायतीसाठी हा महत्त्वाचा विकास प्रकल्प ठरणार आहे.














