शरद पवार 9 नोव्हेंबरला चिपळुणात

चिपळूण : दिवाळी झाल्या-झाल्या निवडणुकीच्या प्रचारसभा व बैठकांचे फटाके वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांकरिता बैठका व जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर, दापोली मतदारसंघासाठी नेत्यांनी सभा व बैठकांचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार 9 नोव्हेंबरला चिपळूण दौर्‍यावर येत असल्याची माहिती मिळाली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून पवारांपर्यंतच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीला हळूहळू राजकीय प्रचाराने रंगत वाढवली आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर व दापोली मतदारसंघात राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठकांसह जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात येणार आहेत. चिपळूण पूर्व विभाग अलोरे, पोफळी, शिरगावसाठी महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी ना. उदय सामंत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. दि. 6 रोजी ना. रवींद्र चव्हाण चिपळूण येथे येत असून महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी (दि. 8) दापोली, गुहागर दौर्‍यावर येत असून त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता या दोन्ही ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. 9 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे चिपळूण दौर्‍यावर येत असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांची प्रचारसभा आयोजित केल्याची माहिती मिळत आहे. एकूणच दिवाळी सणानंतर विविध राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा, बैठकांचे फटाके फुटू लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 06-11-2024