उदय बने यांनी नाखूष न होता प्रवाहात राहावे : विनायक राऊत

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव केला म्हणून नाही, तर उदय बने हे स्वतः इच्छुक असल्याचे अनेकवेळा मला बोलले होते, म्हणून ते उमेदवाराच्या स्पर्धेत होते. त्यांनी नाखुशी न दाखवता राजेंद्र महाडीक यांच्यासारखे पक्षाच्या प्रवाहात रहावे, अशी अनेक वेळा आमची चर्चा झाली, परंतु वेगवेगळ्या सुत्रांकडुन पक्षाने मागविलेल्या अहवालामध्ये उदय बनें पेक्षा बाळ माने उजवे होत होते. त्यामुळे बनेंना उमेदवारी देण्याऐवजी पक्षाने बाळ माने यांना उमेदवारी दिली, असा खुलासा शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तयारीनिमित्त ते रत्नागिरीत होते. यावेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. विनायक राऊत म्हणाले, लोकसभेला निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभेच्या मतदारांनी भरभरून मत दिली. त्यामुळे आम्ही येथे दहा हजाराचे मताधिक्य घेऊ शकलो. आता विधानसभेला देखील त्या मताधिक्यामध्ये तिप्पट वाढ होईल याची आम्हाला खात्री आहे.

शिवसेना पक्षाने बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे. बाळ माने माजी आमदार आणि लोकनेते आहेत. लोकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. सामाजिक कामात त्यांचा चांगला हातखंडा आहे. त्यामुळे लोकं त्यांना मतदान करतील आणि मशाल चिन्हाचा विजय करतील. एकुणच सिंधुदुर्गातील आणि रत्नागिरीतील विधानसभेच्या जागांचा विचार करता आम्हाला चांगले यश मिळेल, असे वातावरण असुन नकीच यावेळी चमत्कार घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उदय बने यांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही अनेकवेळा चर्चेला बसलो. परंतु त्यातुन काही साध्य झाले नाही, शिवसेनेतून प्रबळ दावेदारांमध्ये उदय बने, राजेंद्र महाडीक, बंड्या साळवी आणि बाळ माने हे होते. बंड्या साळवी यांनी यातून माघार घेतली. तर शिवसेना पक्षाने मागविलेल्या राजकीय अहवालामध्ये बने यांच्या पेक्षा बाळ माने हे उजवे होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा पक्षाने निर्णय घेतला. याबाबत बने यांनी नाखुशी न दाखवता महाडीक यांच्या प्रमाणे पक्षाच्या प्रवाहात रहायला हवे, अशी आमची अपेक्षा होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 06/Nov/2024