राजकीय दबावाशिवाय चौकशी करण्याची मागणी; अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धा आरोपांचीही सखोल तपासाची विनंती
रत्नागिरी: रत्नागिरी येथील गिरीजा राऊत यांनी केलेल्या कथित अत्याचार आणि छळवणुकीच्या तक्रारीची कोणत्याही दबावाशिवाय, सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी (भाजपा) महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार तातडीने कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांची भेट घेऊन त्यांना सादर केले. गिरीजा राऊत यांनी दाखल केलेली तक्रार अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस प्रशासनाने पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्याने पावले उचलावीत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही दबावाशिवाय चौकशी करण्याचे आवाहन
अप्पर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात महिला मोर्चाने स्पष्ट केले आहे की, पीडितेने केलेल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासावर कोणताही राजकीय, सामाजिक किंवा बाह्य दबाव येऊ दिला जाऊ नये. पोलीस प्रशासनाने पूर्णतः पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने चौकशी करून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये जर वेळेत आणि योग्य कारवाई झाली, तरच सर्वसामान्य जनतेचा आणि महिलांचा कायद्यावरील व पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असे मत भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
अघोरी प्रथा व अंधश्रद्धा आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
या प्रकरणाला जोडत निवेदनात पुढे म्हटले आहे की, पीडितेच्या तक्रारीमध्ये जर अघोरी प्रथा, जादूटोणा, अंधश्रद्धा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर व सामाजिक विघातक कृत्यांचा समावेश असेल, तर त्या आरोपांची केवळ वरवरची चौकशी न करता पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित कायद्यांनुसार जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कलमांखाली गुन्हे दाखल करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पारदर्शक कारवाईचे आवाहन: “महिला सुरक्षेचा मुद्दा हा आमच्यासाठी सर्वोच्च असून या संपूर्ण प्रकरणात पीडितेला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत प्रशासन स्तरावर योग्य ती कायदेशीर आणि न्याय्य कारवाई व्हावी,” असे आवाहन भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्याक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी केले आहे.
निवेदनावळील प्रमुख उपस्थिती
या महत्त्वपूर्ण मागणीचे निवेदन देताना भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्याक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्यासह खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या:
- जिल्हा सरचिटणीस व उपाध्यक्ष: सौ. नुपुरा मुळ्ये, सौ. श्रुती ताम्हणकर, शीतल रानडे, संगीता कवितके, रुपाली कदम, स्नेहा चव्हाण.
- मंडल अध्यक्ष व पदाधिकारी: सुचिता नाचणकर, भक्ती दळी, अदिती गुडेकर, अनघा साळवी, ध्रुवी लाकडे, शिवानी रेमूळकर, सुमन घाणेकर, सायली काटकर, सुप्रिया बेंद्रे, सुयोगा जठार, सायली बेर्डे, सरिता आंबेकर, सुमन झगडे, रोहिणी सुर्वे, प्रीती शिंदे, राजश्री मोरे, प्रज्ञा शिवगण, मेधा देवस्थळी, वर्षा खंडकर, दिक्षा गजने, सायली वाजे, सुप्रिया देवरुखकर, नेहा दाते, शामल निगडे, माधवी शिंदे, माधुरी शिंदे, विद्या शेट्टी, लेना फुटक, अनुष्का शेलार, विजया भाटकर, प्रज्ञा टाकळे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 18-07-2026














